अमेरिकन दारूवर भारत जड कर लादतो
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतून भारतात ज्या मद्याची निर्यात केली जाते, त्यावर भारतात 150 टक्के कर लावला जातो, अशी तक्रार अमेरिकेने केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलीना लीव्हीट यांनी मंगळवारी यासंबधी वक्तव्य दिले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात लावल्या जाणाऱ्या उच्च करांसंबंधी तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच भारतातून अमेरिकेत येणाऱ्या मालावरही अशाच प्रकारचा कर लावण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. भारताप्रमाणे चीन, युरोपियन महासंघ आणि इतर अनेक देशांवरही अशाप्रकारचे कर लावण्याचे धोरण अमेरिकेने स्वीकारले आहे.
लीव्हीट यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत अमेरिकेच्या वस्तूंवर विविध देशांकडून लावण्यात येणाऱ्या करांची एक सूचीच प्रसिद्ध केली आहे. त्यांना कॅनडासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. कॅनडाने आतापर्यंत अमेरिकेतून आयात केलेल्या वस्तूंवर नेहमीच उच्च कर लावला आहे. यामुळे अमेरिकेची मोठी आर्थिक हानी झाली आहे. अमेरिकेच्या दुग्धोत्पादनांवरही कॅनडात 300 टक्के कर लावला जातो, असे दिसून येते. भारत आणि इतर देशही अशाच प्रकारचे मोठे कर अमेरिकेच्या वस्तूंवर लावतात. हे योग्य नसून यापुढे या देशांना असे करता येणार नाही. आम्ही या देशांना याची जाणीव करुन दिली आहे, अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी केले.
जपानवरही टीका
अमेरिकेतून जपान तांदळाची आयात करतो. या तांदळावर 700 टक्के इतका कर लावला जातो. अशाप्रकारे प्रत्येकच देश अनेक दशकांपासून अमेरिकेला गृहित धरत आला आहे. प्रत्येक देशाने अमेरिकेच्या बाजारपेठेत आपल्या वस्तू कमी करात पाठविल्या आहेत. तर अमेरिकेच्या वस्तूंवर आपल्या देशात प्रचंड कर लावला आहे. यामुळे अमेरिकेच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होत असून यापुढे आम्ही आमची अशी हानी होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.