T20 WC: भारत सहाव्यांदा उपांत्य फेरीत; असा आहे बाद फेरीतील टीम इंडियाचा रेकॉर्ड

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) आपले स्थान निश्चित केले आहे. रविवारी (१ मार्च) कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ५ गडी राखून पराभव करत टीम इंडियाने अंतिम चारमध्ये प्रवेश केला. भारतीय संघ सहाव्यांदा टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ५ मार्च रोजी भारताचा सामना इंग्लंडशी होईल. चला तर मग जाणून घेऊया, आतापर्यंत बाद फेरीच्या (नॉकआउट) सामन्यांमध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली आहे.

​भारतीय संघाने २००७ मध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीत उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले होते. एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या सामन्यात युवराज सिंगने अप्रतिम फलंदाजी करत ३० चेंडूत ७० धावांची धडाकेबाज खेळी केली होती. तर धोनीने १८ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटने खेळताना नाबाद ३६ धावा केल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ५ गडी गमावून धावफलकावर १८८ धावा लावल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा संघ ७ गडी गमावून केवळ १७३ धावाच करू शकला होता. गोलंदाजीमध्ये इरफान पठाण आणि जोगिंदर शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले होते.

​२००७ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाला टी-२० विश्वचषकाची पुढची उपांत्य फेरी खेळण्याची संधी ७ वर्षांनंतर मिळाली. टी-२० विश्वचषक २०१४ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी झाला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. मात्र, टीम इंडियाने १७३ धावांचे लक्ष्य केवळ ४ गडी गमावून १९.१ षटकांत पूर्ण केले होते. विराट कोहलीने उत्कृष्ट फलंदाजी करत ४४ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी केली होती.

​२०१६ मध्ये मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना वेस्ट इंडिजशी झाला होता. विराट कोहलीच्या ८९ आणि रोहित शर्माच्या ४३ धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत २ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या. मात्र, लेंडल सिमन्सची नाबाद ८२ आणि जॉन्सन चार्ल्सची ३६ चेंडूंतील ५२ धावांची खेळी यांच्या जोरावर कॅरेबियन संघ १९३ धावांचे लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरला होता.

​२०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. हार्दिक पांड्याची ३३ चेंडूंतील ६३ धावांची धडाकेबाज खेळी आणि विराट कोहलीच्या ५० धावांच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांत ६ गडी गमावून धावफलकावर १६८ धावा केल्या होत्या. मात्र, इंग्लंडने जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर एकही गडी न गमावता १६९ धावांचे लक्ष्य गाठले होते.

​टी-२० विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करून गेल्या विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने ३९ चेंडूत ५७ धावांची दमदार खेळी केली होती, तर सूर्यकुमार यादवने ४७ धावांचे योगदान दिले होते.

​मात्र, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज शरणागती पत्करली होती. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या १०३ धावांवर गारद झाला होता. कुलदीप आणि अक्षर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले होते.

Comments are closed.