रशियासाठी भारत हा नैसर्गिक पर्याय!
रशिया-युरोप तणावादरम्यान जयशंकर यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान रशियासोबत भारताचे मजबूत संबंध आणि चीनसोबतच्या सीमा वादावर भारताची स्पष्ट भूमिका जगासमोर ठेवली आहे. युरोपसोबतच्या कटूतेनंतर रशियासाठी भारत एक नैसर्गिक पर्याय असल्याचे प्रतिपादन जयशंकर यांनी ब्लूमबर्गचे संपादक जॉन मिकेलथवेट यांच्यासोबतच्या संभाषणावेळी केले आहे. युक्रेन युद्धानंतर रशिया आणि युरोपचे संबंध पूर्णपणे तुटले आहेत आणि त्यात मोठ्या प्रमाणात कटूता निर्माण झाली आहे. ऐतिहासिक स्वरुपात रशिया स्वत:ला युरोपीय देश मानत राहिला आहे, परंतु आता स्थिती बदलल्यामुळे रशियाला नाईलाजास्तव आशियाच्या दिशेने वळावे लागले असून यात चीन त्याच्या प्राथमिकतेत असल्याचे जयशंकर म्हणाले.
भारत मागील 75-80 वर्षांपासून रशियाचा विश्वासू आणि स्थिर साथीदार राहिला आहे. आज पूर्ण जग बदलले असताना भारत पारंपरिक संबंध पूर्वीप्रमाणेच मजबूत असल्याचा विश्वास रशियाला देत असल्याचा दावा जयशंकर यांनी केला आहे.
आशियात शक्तिसंतुलन आवश्यक
भारताची ही भूमिका केवळ दोन्ही देशांच्या हिताची नसून ती आशियात शक्तिसंतुलन कायम राखण्यासाठी देखील अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून रशियाकडे आशियामध्ये अन्य मजबूत पर्याय देखील उपलब्ध रहावेत असे उद्गार जयशंकर यांनी काढले आहेत.
चीनला दिला सल्ला
याचदरम्यान जयशंकर यांनी भारत आणि चीनच्या संबधांवरही भूमिका मांडली. दोन्ही देशांदरम्यान सीमा वाद दशकांपेक्षा जुना आहे. 1975 ते 2020 पर्यंत सीमेवर एकही गोळी झाडली गेली नाही आणि रक्तही वाहिले नव्हते. परंतु 2020 च्या कोरोना महामारीदरम्यान झालेल्या झटापटींनी या स्थितीला पूर्णपणे बदलले आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापर आणि उर्वरित संबंध सामान्य व्हायचे असतील तर सीमेवर शांतता आणि स्थिरता कायम राखणे सर्वात प्रथम आणि अनिवार्य अट असल्याचे भारताने चीनसमोर स्पष्ट केल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.
Comments are closed.