“भारत इथेच चूक करत आहे”, तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी गौतम गंभीरवरती संतापला ‘हा’ दिग्गज!

पूर्व भारतीय फलंदाज रॉबिन उथप्पा यांनी एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजीच्या रणनीतीमध्ये भूमिकेबद्दल स्पष्टतेचा अभाव असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, डावाच्या सुरुवातीला जास्त लवचिकता ठेवल्यामुळे धावा करणे कठीण होते.

भारतीय संघ गुरुवारी मुल्लनपूर येथे झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 214 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 19.1 षटकांत 162 धावांवर बाद झाला. या 51 धावांच्या पराभवामुळे पाच सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली. उथप्पा म्हणाले की, समस्या सुरुवातीला गमावलेल्या विकेट्सची नव्हती, तर शुबमन गिल बाद झाल्यानंतर अवलंबलेल्या रणनीतीची होती. भारताकडे मजबूत फलंदाजी क्रम आहे, पण संघाने त्याचा पुरेसा वापर केला नाही.

जिओ हॉटस्टार’वर बोलताना ते म्हणाले, ‘‘जेव्हा शुबमन गिल बाद झाला, तेव्हा अक्षर पटेल फलंदाजीला आला. त्या वेळी त्याला अशा फलंदाजाची भूमिका पार पाडायची होती, जो धोका पत्करून फलंदाजी करेल आणि वेगाने धावा करून अभिषेक शर्मावरील दबाव कमी करेल.’’

उथप्पा यांचे मत होते की, अक्षर पटेलने धीम्या गतीने खेळलेल्या 21 धावांच्या खेळीमुळे दबाव कमी करण्यात यश आले नाही. परिणामी, त्याच्या आजूबाजूला विकेट्स पडू लागल्या आणि रणनीतीमध्ये बदल करावा लागला. यामुळे लक्ष्याचा पाठलाग करण्याची गती आणखी मंदावली. ते म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाजांना त्यांच्या भूमिकांबद्दल आणि डाव कसा पुढे न्यायचा याबद्दल स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले, ‘‘पहिले सहा ते आठ षटके झाल्यानंतर फलंदाजांच्या रणनीतीमध्ये लवचिकता असणे ठीक आहे, परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यापूर्वी एका मजबूत पायाची गरज असते. मजबूत पाया (आधार) असल्याशिवाय गगनचुंबी इमारत उभी करता येत नाही.’’
उथप्पा यांनी स्पष्ट केले, ‘‘एकाच सामन्यात खेळाडूंकडून अनेक भूमिका पार पाडण्याची अपेक्षा ठेवणे गोष्टी क्लिष्ट करते आणि भारत नेमकी इथेच चूक करत आहे. मी सलामीच्या फलंदाजांमध्ये आणि डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अति प्रमाणात लवचिकता दाखवण्याच्या बाजूने नाही.’’

Comments are closed.