कॅरेबियन वादळ अन् ईडन गार्डन हादरलं! शेवटच्या 30 चेंडूत फिरला सामना, 195 चा डोंगर; सेमीफायनलसाठ
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज स्कोअर: कोलकातातील ईडन गार्डन्स मैदानावर रंगलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 195 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये या मैदानावरील हा चौथा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम ठरला आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डेथ ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई झाली. अखेरच्या 30 चेंडूमध्ये कॅरेबियन फलंदाजांनी तब्बल 75 धावा चोपल्या आणि सामन्याचे पारडे फिरवले.
आता उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे असेल, तर टीम इंडियाला याच मैदानावर टी-20 इतिहासातील सर्वात मोठा धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. कोलकात्याच्या या ऐतिहासिक मैदानावर भारतासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
भारताला करावा लागणार सर्वात मोठा रनचेस
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये ईडन गार्डन्स येथे आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी रनचेस केवळ 158 धावांचा आहे. विशेष म्हणजे हा विक्रम स्वतः भारताच्या नावावर आहे, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध 158 धावांचे लक्ष्य गाठले होते. पण आजची परिस्थिती वेगळी आणि अधिक कठीण आहे. जिथे 160 धावांचाही पाठलाग कधी झाला नाही, तिथे आता टीम इंडियाला त्यापेक्षा तब्बल 36 धावा जास्त, म्हणजेच 196 धावांचे आव्हान पेलावे लागणार आहे.
वेस्ट इंडिजची सावध सुरुवात
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना शाय होप आणि रोस्टन चेस यांनी संयमी सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी वरुण चक्रवर्तीने मोडीत काढली. एका टप्प्यावर 9 षटकांत केवळ 69 धावा झाल्या होत्या, त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सामना आवाक्यात ठेवला होता.
शेवटच्या 11 षटकांत धावांचा पाऊस
पहिल्या 9 षटकांत 69 धावा झाल्यानंतर पुढील 11 षटकांत मात्र वेस्ट इंडिजने 126 धावांची भर घातली. विशेषतः अखेरच्या 5 षटकांत जेसन होल्डर आणि रोवमन पॉवेल यांनी अक्षरशः तुफान माजवले. 35 चेंडूंमध्ये 76 धावांची भागीदारी करत त्यांनी सामन्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. शेवटच्या 5 षटकांतच 75 धावा कुटल्या गेल्या. होल्डरने 22 चेंडूत 37 धावा केल्या, तर पॉवेलने 19 चेंडूत 34 धावांची आक्रमक खेळी साकारली. भारतीय गोलंदाजांची अखेरच्या षटकांत चांगलीच धुलाई झाली. जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले, तर वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट मिळवली. मात्र धावांचा वेग रोखण्यात भारतीय आघाडी अपयशी ठरली.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.