भारत-नेपाळ लष्करप्रमुखांची बैठक
संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवी दिल्ली येथे सध्या संयुक्त राष्ट्रांच्या सैन्य योगदान देणाऱ्या देशांच्या (युएनटीसीसी) प्रमुखांची परिषद सुरू आहे. या परिषदेवेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नेपाळी सैन्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल प्रदीप जंग यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी संयुक्त प्रशिक्षणासह विविध मुद्यांवर चर्चा करताना दोन्ही शेजारील सैन्यांमधील शाश्वत भागीदारीवर अधिक भर दिला होता. या आठवड्याच्या प्रारंभी ही परिषद सुरू झाली आहे. या परिषदेच्या माध्यमातून एक विशेषाधिकार नाही तर जागतिक शांततेच्या उदात्त ध्येयाला बळकटी मिळत असल्याचा दावा लष्करप्रमुख द्विवेदी यांनी केला आहे.
नेपाळच्या लष्करप्रमुखांशी झालेल्या बैठकीत संरक्षण सहकार्य मजबूत करणे, संयुक्त प्रशिक्षण उपक्रम वाढवणे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सहकार्याला प्रोत्साहन देणे यावर लक्ष केंद्रित केले गेले. दोन्ही नेत्यांनी नियमित संरक्षण संवाद आणि संस्थात्मक देवाणघेवाणीसाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत आणि नेपाळमध्ये संरक्षण व सुरक्षा क्षेत्रात व्यापक परस्पर फायदेशीर सहकार्य आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये परस्पर विश्वास आणि आदर असण्यासोबतच सुसंवादी संबंध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताने 14 ते 16 ऑक्टोबरदरम्यान दिल्लीमध्ये ‘युएनटीसीसी’ प्रमुखांची परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये 30 हून अधिक देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी जगभरातील सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांनी जटिल जागतिक सुरक्षा वातावरणातील आव्हानांवर चर्चा केली. तसेच वेगवेगळे देश सहकार्य कसे मजबूत करू शकतात आणि एकाचवेळी जागतिक शांततेच्या उदात्त ध्येयाला कसे पुढे नेऊ शकतात यावरही विचारमंथन झाले.
Comments are closed.