वनडे संघातील वातावरण बिनसलं; गौतम गंभीर अन् टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये तणाव, नेमकं काय घ


बीसीसीआयची बैठक गौतम गंभीर अजित आगरकर : दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात बीसीसीआयने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एकदिवसीय मालिकेदरम्यान संघ व्यवस्थापनासोबत विशेष बैठक घेण्याची योजना आखण्यात आली आहे. अलीकडेच टीम इंडियाने रांचीमध्ये झालेला पहिला वनडे 17 धावांनी जिंकत शानदार सुरुवात केली.

आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी रायपूरमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबाबत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच 2027 च्या विश्वचषकासाठी गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्याकडून त्यांच्या दीर्घकालीन योजनांबाबत सविस्तर माहिती घेतली जाऊ शकते.

वनडे संघातील वातावरण बिनसलं, चर्चांना उधाण….

दरम्यान, भारतीय टी-20 आणि कसोटी संघाचे वातावरण अत्यंत चांगले असल्याचे म्हटले जात आहे, पण वनडे संघाचे वातावरण बिघडलेले असल्याची चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी पहिल्या वनडेनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, “कोणतीही रिव्ह्यू मीटिंग नाहीये. रिव्ह्यूची गरजच काय?”

गौतम गंभीर अन् टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंमध्ये तणाव?

बीसीसीआयमधील एका सूत्रानुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहली व रोहित शर्माच्या नात्यात पूर्वीसारखी गोडी राहिलेली नाही. याचा परिणाम पुढील काळात दिसू शकतो. रोहित आणि विराटच्या भविष्यासंदर्भात रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या वनडे दरम्यान किंवा नंतर विशाखापट्टणममध्ये बैठक होऊ शकते. यापूर्वी दिल्लीमध्येही बैठक ठेवण्याची चर्चा झाली होती, पण ती झाली नाही.

ड्रेसिंग रूममधील वातावरण बिनसलं, नेमकं काय घडलं?

खरंतर, ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान रोहित आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात कोणतीही चर्चा झाल्याचे दिसले नव्हते. तसेच, ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर आजपर्यंत गंभीर आणि कोहलीच्या दरम्यान फारसे बोलताना दिसले नाही, असेही निरीक्षणात आले आहे. याशिवाय, विराट आणि रोहितच्या चाहत्यांनी इंटरनेटवर गंभीरवर केलेल्या ट्रोलिंगमुळे बीसीसीआयही नाराज असल्याचे समजते.

विराट कोहलीने कसोटी पुनरागमनाच्या चर्चांना पूर्णविराम दिला

विराट कोहलीने स्वतःच कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या अटकळी खोडून काढल्या. सामना संपल्यानंतर प्रेझेंटर हर्षा भोगले यांनी विचारले, “आता आपण फक्त वनडेच खेळणार?” यावर विराट हसत म्हणाला, “हो, मी फक्त वनडेच खेळणार आहे.”

विराट पुढे म्हणाला की, “मी आता 37 वर्षांचा आहे. त्यामुळे रिकव्हरी महत्त्वाची आहे. माझ्याकडे असलेल्या अनुभवाच्या आधारे, मी ज्या सामन्यांमध्ये खेळतो त्यासाठी शारीरिक तयारी, मानसिक ऊर्जा आणि उत्साह कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.”

बीसीसीआय सचिवांनीही अफवा फेटाळल्या

याआधी बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी कोहलीला टेस्ट निवृत्ती मागे घेण्यासाठी विनंती केली जाणार असल्याच्या सर्व अफवा नाकारल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवानंतर अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र सैकिया यांनी स्पष्ट सांगितले की, “विराट कोहलीशी अशा कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. या सगळ्या केवळ अफवा आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका.”

हे ही वाचा –

Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध

आणखी वाचा

Comments are closed.