आजपासून मालिका बचाव मोहीम, पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचे मालिका जिंकण्याचे, तर हिंदुस्थानचे मालिका बरोबरीत सोडवण्याचे प्रयत्न

पहिल्या कसोटीत फिरकीच्या तावडीत सापडलेले हिंदुस्थानी वीर आता गुवाहाटीत एका वेगळय़ा मोहिमेवर आहेत, ती म्हणजे मालिका बचाव मोहीम. कर्णधार शुभमन गिलच्या मानदुखीनंतर ऋषभ पंतकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून संघाला गुवाहाटीत सन्मान मिळवून देण्याचे आव्हान त्याच्यापुढे उभे ठाकले आहे.

पहिल्या कसोटीत हिंदुस्थानी फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली होती. सायमन हार्मरपुढे सारे नतमस्तक झाले होते. आता गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर फिरकीचा गुंता सोडवण्याची जबाबदारी यशस्वी जैसवाल आणि के. एल. राहुल यांची असेल. कर्णधार शुभमन गिल अनुपस्थित असल्याने नेतृत्वच नव्हे तर आघाडीच्या फलंदाजांचीही कसोटी लागली आहे. हा कसोटी सामना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठीही महत्त्वपूर्ण चाचणी ठरणार आहे. त्यांच्यावर संघनिवडीतील व निर्णयप्रक्रियेत स्पष्टतेचा अभाव जाणवत असल्याची टीका होत आहे.

गेल्या तीन दशकांपासून घरच्या मैदानांवर अजेय वाटणाऱ्या हिंदुस्थानी संघाच्या वर्चस्वाला न्यूझीलंडने सुरुंग लावला होता. आता दक्षिण आफ्रिकेनेही त्यात भर पाडून हिंदुस्थानी किल्ल्याला कोलकात्यात भगदाड पाडले आहे. आता ते भगदाड गुवाहाटीत भरून काढण्याची जबाबदारी फलंदाजांवर येऊन ठेपलीय. यंदा प्रथमच घरच्या मैदानावर हिंदुस्थान संघ प्रबळ दावेदार म्हणून नाही तर बचावात्मक दृष्टिकोनातून खेळ सुरू करणार आहे. तज्ञांच्या मतानुसार हे संघासाठी चिंतेचे संकेत आहेत.

2024 साली न्यूझीलंडच्या मिचेल सॅण्टनरने हिंदुस्थानच्या मायदेशातील विजयाची धार कमी केल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सायमन हार्मर आणि त्याचे सहकारी युवा खेळाडू या हिंदुस्थानी फलंदाजांसाठी ठोस आव्हान निर्माण करत आहेत. फिरकीविरुद्ध योग्य तांत्रिक तयारीचा अभाव व मानसिक दडपण हे मोठे प्रश्न बनत आहेत.

बारसापारा मैदानावर लाल मातीच्या पिचवर पंतला स्वतःच्या फलंदाजीसह आपल्या नेतृत्वाचीही कमाल दाखवावी लागणार आहे. शुभमन गिलच्या मानदुखीमुळे त्याच्या सहभागावर सुरुवातीपासूनच संशय होता. अखेरीस तो उपचारासाठी मुंबईला पोहोचल्याचे कळले आहे.

सुदर्शनला संधीची शक्यता

  • गिलच्या जागी साई सुदर्शन खेळण्याची दाट शक्यता आहे. तिसऱया क्रमांकावर तो खेळणार की वॉशिंग्टन सुंदर हा पुन्हा त्याच स्थानावर खेळायला येणार याबाबत संभ्रम कायम आहे. पंतने टी-20 संघाचे नेतृत्व केले असले तरी लाल चेंडूतील त्याचा हा मोठा कसोटीचा टप्पा असेल. कोलकाता कसोटीतील काही निर्णयांवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.
  • पहिल्या कसोटीत दुसऱया दिवसअखेर पाहुण्यांची 7 बाद 93 अशी केविलवाणी अवस्था होती, मात्र तिसऱया दिवशी सकाळी बुमरा-सिराजकडून सुरुवात न करवून घेतल्याची किंमत संघाला चुकवावी लागली. संघरचनेतही काही ठोस बदल करण्याची गरज असल्याचे क्रिकेटतज्ञांचे स्पष्ट मत आहे.
  • दुसरीकडे हिंदुस्थानी संघात बरेच डावखुरे फलंदाज असल्याने हार्मरला पुन्हा आपला प्रभाव दाखवण्याची संधी आहे. बरसापाराची खेळपट्टीचे रागरंग काय आहेत ते उद्या कळेलच, पण त्याआधी अक्षर पटेल किंवा कुलदीप यादव यांच्यातील एकाला बसवून नितीश रेड्डीला संधी देण्याचा विचार केला जात आहे. त्यामुळे तिसऱया वेगवान गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
  • हिंदुस्थान – ऋषभ पंत (कर्ंधर/यष्टिरक्षक), के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, आकाशदीप.
  • दक्षिण आफ्रिका – टेम्बा बावुमा (कर्ंधर), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जोर्झी, झुबेर हमझा, सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, सेनुरान मुथुसामी, लुंगी एनगिडी, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन के स्टुब्स, ट्रिस्टन के.

Comments are closed.