क्रिकेटमधील लिंबूटिंबू संघाने टीम इंडियाला हरवलं; एका पराभवाने भारत स्पर्धेबाहेर, तर पाकिस्तान


हाँगकाँग सिक्स 2025 मध्ये भारत उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीत बाहेर पडला : भारताला हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत मोठा धक्का बसला आहे. शनिवारी झालेल्या सहा-सहा षटकांच्या या सामन्यात कुवेतने भारताचा 27 धावांनी पराभव केला. भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. कुवेतने प्रथम फलंदाजी करत केवळ सहा षटकांत पाच गडी गमावून 106 धावा केल्या. प्रत्युत्तर भारताची संपूर्ण संघ फक्त 5.4 षटकांत 79 धावांवर गारद झाला. याआधी भारताने आपल्या पहिल्या गट-सामन्यात पाकिस्तानवर डकवर्थ-लुईस नियमांतर्गत दोन धावांनी विजय मिळवला होता. मात्र या पराभवानंतर भारत पूल-सी मध्ये पाकिस्तान आणि कुवेतनंतर तिसऱ्या स्थानावर राहिला.

खराब सुरुवात, पण शेवट चांगला

पहिल्यांदा फलंदाजी करताना कुवेतची सुरुवात खराब झाली. अदनान इद्रीस फक्त 6 धावा करून बाद झाला, तर मीत भवसार शून्यावर माघारी परतला. मात्र बिलाल ताहिरने केवळ 9 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 25 धावा केल्या. रविजा संदरुवान (7) आणि मोहम्मद शफीक (9) फारसा वाटा उचलू शकले नाहीत. पण कर्णधार यासिन पटेलने तब्बल 14 चेंडूत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने 58 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे कुवेतने ठरलेल्या 6 षटकांत 5 गडी गमावून 106 धावा केल्या.

रॉबिन उथप्पा शून्यावर OUT

107 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवातच खराब झाली. रॉबिन उथप्पा शून्यावर बाद झाला. प्रियांक पांचाळने 10 चेंडूत 17 धावा केल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने 8 आणि स्टुअर्ट बिन्नीने 2 धावा केल्या. अभिमन्यु मिथुनने मात्र थोडा प्रतिकार केला, त्याने 9 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने 26 धावा ठोकल्या. शाहबाज नदीमनेही 8 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह 19 धावा जोडल्या, पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी ते अपुरे ठरले.

एका पराभवाने भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला

या पराभवानंतर भारताला क्वार्टर फायनलचे तिकीट मिळाले नाही आणि आता तो ‘बाउल स्टेज’ मध्ये खेळत आहे. या टप्प्यात भारतासोबत श्रीलंका, यूएई आणि नेपाळ हे संघ आहेत. भारताचा सध्या यूएईविरुद्ध सामना सुरू असून, पुढे त्यांचा सामना आजच नेपाळशी आणि 9 नोव्हेंबरला श्रीलंकेशी होणार आहे. अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, कुवैत, हॉन्गकॉन्ग आणि बांगलादेश हे क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवणारे संघ आहेत.

या स्पर्धेत एकूण 12 संघ झाले सहभागी

या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी आहेत. चार गटांमध्ये प्रत्येकी तीन संघ असे विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांना उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर फायनल) स्थान मिळते, तर तिसऱ्या क्रमांकाच्या संघांना ‘बाउल स्टेज’ मध्ये खेळावे लागते. नंतर क्वार्टर फायनलपासून स्पर्धा नॉकआउट स्वरूपात जाते, ज्यात मुख्य फायनल, प्लेट फायनल आणि बाउल फायनल असे वेगवेगळे स्तर असतात.

हे ही वाचा –

Ind vs Pak Hong Kong Sixes 2025 : पाऊस आला अन् सामना फिरला! भारताने पाकिस्तानला पुन्हा लोळवलं, 2 धावांनी मिळवला विजय

आणखी वाचा

Comments are closed.