एसीसीच्या बैठकीत ट्रॉफीवरून हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये खडाजंगी! मैदानाबाहेर राडे सुरूच

आशिया चषकाच्या मैदानावर झालेले राडे आता मैदानाबाहेरही होऊ लागलेत. आशिया चषक स्पर्धेची ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष असलेल्या मोहसीन नकवीकडून स्वीकारण्यास हिंदुस्थानी कर्णधार सूर्यकुमार यादवने नकार दिल्यानंतर नकवींनी ती ट्रॉफी स्वतःकडेच ठेवली. यावरून एसीसीच्या बैठकीत खडाजंगी झाली. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नकवी यांना सुनावले. ट्रॉफी ही एससीसीची मालमत्ता आहे, तुमची नव्हे. ती अधिकृतरीत्या विजेत्या हिंदुस्थानकडे सुपूर्द करायला हवी, असे शुक्ला बैठकीत म्हणाले.
एसीसीच्या बैठकीत हिंदुस्थानने अंतिम सामन्यानंतर झालेल्या ‘ट्रॉफी वादावर’ आक्षेप नोंदवला. हिंदुस्थानने विजय मिळवल्यानंतरही नकवींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास संघाने नकार दिला होता. त्यानंतर नकवी यांनी ती ट्रॉफी स्वतःकडेच ठेवली आणि आपल्या हॉटेलच्या खोलीत नेली. नकवींच्या या कृतीवर बीसीसीआयने बैठकीत आपला आक्षेप नोंदवला.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठकीत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना नकवींना धारेवर धरले. शुक्ला म्हणाले, “ट्रॉफी ही एसीसीची मालमत्ता आहे, नकवींची खासगी नाही! ती अधिकृतरीत्या हिंदुस्थानला सुपूर्द करायला हवी. मात्र नकवींनी आपल्या हट्टावर ठाम राहत ट्रॉफी सोडण्यास नकार दिला. उलट, या सगळय़ात मी एखाद्या कार्टूनप्रमाणे दिसलो,’’ अशी किरकोळ सफाई देत त्यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला. या बैठकीला बीसीसीआयचे प्रतिनिधी आशीष शेलार उपस्थित होते. त्यांच्या आक्षेपानंतर नकवी यांनी हिंदुस्थान संघाला विजयाच्या औपचारिक शुभेच्छा दिल्या.
आयसीसीकडे तक्रार करणार
नकवी यांची नकारघंटा थांबत नव्हती. बैठकीत कोणताच तोडगा निघत नसल्याने अखेर बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी बैठक अर्ध्यावरच सोडली. बीसीसीआयने आता याबाबत आयसीसीकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments are closed.