…तर ऑस्ट्रेलियन आणि आफ्रिकन खेळाडू आयपीएल खेळणार नाहीत

देशात सीमेवर सुरू असलेल्या युद्धसदृश स्थितीमुळे बीसीसीआयने देशहितासाठी सध्या सुरू असलेल्या आयपीएलला एका आठवडय़ाचा ब्रेक दिला असला तरी यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. स्पर्धेला प्रारंभ होण्यास आठवडय़ापेक्षा अधिक विलंब झाल्यास आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत ऑस्ट्रेलियन आणि दक्षिण आफ्रिकन खेळाडू माघार घेण्याची शक्यता आहे. येत्या 11 ते 15 जूनदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लॉर्ड्सवर जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळविला जाणार आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार आयपीएलचा अंतिम सामना 25 मे रोजी खेळविला जाणार होता. मात्र सध्या बीसीसीआयला आयपीएलला आठवडय़ाची विश्रांती देत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ही विश्रांती आठवडय़ापेक्षा वाढली तर याचा फटका प्ले ऑफसाठी प्रयत्न करत असलेल्या सातही संघांना बसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील मिचेल स्टार्प (दिल्ली), जॉश हेझलवूड (बंगळुरू), जॉश इंगलिस (पंजाब) या खेळाडूंसाठी आपला राष्ट्रीय संघ महत्त्वाचा आहे आणि त्यांना आगामी डब्ल्यूटीसीच्या फायनलच्या सरावासाठी लंडन गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एकही ऑस्ट्रेलियन आयपीएलसाठी राष्ट्रीय संघाच्या कार्यक्रमांना टाळणार नाही.
तसेच दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातील एडन मार्परम (लखनौ), रायन रिकल्टन (मुंबई), ट्रिस्टन स्टब्ज (दिल्ली), माकाx यान्सन (पंजाब), जिराल्ड कोत्झी (गुजरात) तसेच का@र्बिन बॉश (मुंबई) आणि लुंगी एनगिडी (बंगळुरू) हे खेळाडू सध्या आयपीएलमध्ये धमाका करताहेत. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ खेळणार आहेत हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन-आफ्रिकन खेळाडू न खेळल्यास कोणत्या आयपीएल संघांना सर्वात मोठा फटका बसेल, हे सांगणे कठीण आहे. पण आयपीएलच्या उर्वरित सामन्यांना आयोजित करण्यात विलंब झाल्यास ऑस्ट्रेलिन-आफ्रिकनच नव्हे तर सर्वच विदेशी खेळाडूंशिवाय आयपीएलचे उर्वरित खेळावे लागण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानात निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे कोणतेही क्रिकेट मंडळ आपल्या खेळाडूंना हिंदुस्थानात उर्वरित आयपीएल सामने खेळण्याची परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. अशा स्थितीत आयपीएल खऱयाअर्थाने हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचीच लीग म्हणून प्रथमच खेळली जाईल.
Comments are closed.