तांदूळ उत्पादनात भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.

चीनलाही टाकले मागे, ‘बासमती’ क्रांती हे कारण

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

तांदूळ उत्पादनात भारताने साऱ्या जगात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. चीनलाही भारताने आता मागे टाकले असून ही बाब अत्यंत महत्वाची मानली जात आहे. जागतिक तांदूळ उत्पादनात आता भारताचा वाटा 28 टक्के इतका पोहचला आहे. भारताची ही उपलब्धी अमेरिकेच्या कृषी विभागानेही मान्य केली.

अमेरिकेच्या कृषी विभागाने जगातील तांदूळ उत्पादनासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला आहे. डिसेंबर 2025 च्या या अहवालात भारताची प्रशंसा करण्यात आली आहे. भारताचे तांदूळ उत्पादन आता 15 कोटी 20 लाख टनांपर्यंत पोहचले असून चीनचे उत्पादन 14 कोटी 60 लाख टन इतके आहे. याचा अर्थ असा की चीन तांदूळ उत्पादनात भारतापेक्षा 60 लाख टनांनी मागे पडला आहे. त्यामुळे भारत आता जगाचा ‘तांदूळ सम्राट’ झाल्याचे अहवालात स्पष्ट केले गेले आहे.

आतापर्यंत होता चीन

आतापर्यंतच्या समजुतीनुसार चीन हा जगातील सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश मानला जात होता. तथापि, आता ते स्थान भारताने पटकाविले आहे. भारताच्या या यशात चीनचा पारंपरिक प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या तैवान या देशाचेही योगदान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तांदूळ उत्पादनात भारत बरीच दशके चीनच्या मागे पडला होता. गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये भारताने ही आघाडी घेतली आहे.

कौतुकास्पद कामगिरी

तांदूळ उत्पादनात भारताने चीनला मागे टाकणे, ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. किमान 20 सहस्र वर्षांपासून भारतात तांदळाचे उत्पादन होते. तांदळाचा मूळ स्रोत भारतच आहे, असे मानले जाते. आज जगात तांदळाच्या 1 लाख 23 हजार जाती आढळतात. त्यांच्यापैकी 60 हजारांहून अधिक. अर्थात जवळपास निम्म्या एकट्या भारतात आहेत. तथापि, भारताचे तांदळाचे एकरी उत्पादन चीनपेक्षा कमी होते. त्यामुळे तो मागे पडला होता. आता ही उणीव झपाट्याने भरुन निघत असल्याचे दिसून येत आहे.

निर्यातीतही मोठा वाटा

भारताचा तांदूळ आज जगातील 172 देशांना निर्यात केला जातो. 2024-2025 या वर्षात भारताने 4 लाख 50 हजार 840 कोटी रुपयांची कृषी उत्पादने निर्यात केली आहेत. या निर्यातीत तांदळाचा वाटा 24 टक्के इतका आहे. बासमती आणि बिगर बासमती तांदळाची 1 लाख 7 हजार 520 कोटी रुपयांची निर्यात भारताने गेल्या एका वर्षात केली आहे. परिणामी, तांदूळ हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचेही महत्वाचे साधन ठरत आहे, असे दिसून येते.

बासमतीची क्रांती

‘बासमती’ या अस्सल भारतीय तांदळाच्या वाणाने भारतात तांदूळ क्रांती घडविली आहे. भारताचा बसमती तांदूळ अन्य कोणत्याही देशापेक्षा जगात अधिक लोकप्रिय आहे. भारताच्या तांदूळ निर्यातीतही बासमतीचा वाटा प्रमाण आणि किंमत या दोन्ही दृष्टींनी मोठा आहे. ‘पुसा बासमती-1121’ हे वाणाला मागणी सर्वाधिक आहे. हा तांदूळ कच्च्या स्वरुपात सरासरी 9 मिलिमीटर लांब तर शिजवलेल्या स्वरुपात 15 ते 22 मिलीमीटर लांब असतो, असे दिसून येते.

तैवानचे योगदान लक्षणीय

भारताच्या या तांदूळ क्रांतीत भारताचे शेतकरी आणि कृषीशास्त्रज्ञ यांचे योगदान नि:संशय निर्णायक आहे. पण तैवान या देशाचाही वाटा या यशात महत्वाचा आहे. 1960 च्या दशकात भारत अन्नधान्यांच्या उत्पादनाच्या संदर्भात अडचणीच्या स्थितीत होता. त्यावेळी भारतात पारंपरिक पद्धतीचा उंच रोपांचा तांदूळ पिकविला जात होता. तेव्हा भारताचे तांदळाचे उत्पादन हेक्टरी अवघे 800 किलो होते. त्यावेळी तैवानने भारताला तांदळाची कमी उंचीची आणि जाड काडीची वाणे पुरविली होती. ‘तैचुंग नेटिव्ह-1’ हे तैवानी वाण भारतासाठी अत्यंत अनुकूल ठरले होते. त्यामुळे भारताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले, असे दिसून येते. नंतर  आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्राने भारतात ‘आय आर 8’ हे मध्यम उंचीचे वाण आणले. त्याचाही मोठा लाभ झाला. अशा प्रकारे हा ‘तांदूळ’ प्रवास होत आहे.

भारताचे ‘तांदूळ यश’

ड भारतात यावर्षी झाले 15 कोटी 20 लाख टन तांदळाचे उत्पादन

ड हे उत्पादन चीनच्या तांदूळ उत्पादनापेक्षा 60 लाख टनांनी अधिक

ड भारताचा ‘बासमती’ तांदूळ गुणवत्तेच्या दृष्टीने जगात आज सर्वश्रेष्ठ

Comments are closed.