युरोपला शस्त्रास्त्र पुरवठ्यात भारताचा दुसरा क्रमांक लागतो

रशिया-युक्रेन युद्धानंतर निर्यातीत 1600 टक्क्यांची वाढ : दक्षिण कोरियानंतर दुसरे स्थान

जागतिक संरक्षण क्षेत्रात भारताचे महत्त्व वेगाने वाढत असून, पूर्व आणि मध्य युरोपला दारूगोळा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये भारताने दक्षिण कोरियानंतर दुसरे स्थान मिळवले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने युरोपीय देशांना सुमारे8,271 कोटी रुपयांचा दारूगोळा पुरविल्याचे व्यापारविषयक आकडेवारीतून समोर आले आहे. या काळात भारताच्या संरक्षण निर्यातीत तब्बल 1600 टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली आहे. तोफांचे गोळे, मोर्टार शेल आणि इतर लष्करी साहित्याच्या उत्पादनात भारतीय कंपन्यांची क्षमता वाढली आहे. युरोपमध्ये युद्धामुळे निर्माण झालेली दारूगोळ्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताकडू पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पूर्वी या क्षेत्रातील पुरवठादारांच्या यादीत 28 व्या क्रमांकावर असलेला भारत आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

इस्रायललाही संरक्षण साहित्याचा मोठा पुरवठा

युरोपबरोबराच पश्चिम आशियातील संरक्षण बाजारपेठेतही भारताची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. मार्च 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार इस्रायला विमानांचे, हेलिकॉप्टरचे आणि ड्रोनचे सुटे भाग पुरवणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 2023 मध्ये भारत याप्रकरणी नवव्या स्थानावर होता. याशिवाय मागील दोन वर्षांत भारताने इस्रायलला सुमारे 630 कोटी रुपयांचे तोफगोळे, मोर्टार राउंड आणि स्फोटक साहित्य पुरवल्याचे समजते. हा पुरवठा त्याआधीच्या 6 वर्षांतील एकूण निर्यातीइतका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

युरोपला भारतीय संरक्षण उद्योगाचा आधार

स्वीडनमधील स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टीट्यूट या संस्थेचे वरिष्ठ संशोधक सिमोन वेझमन यांच्या मते, युक्रेनच्या युद्धकालीन गरजा आणि युरोपमधील वाढती संरक्षणविषयक मागणी पूर्ण करण्यासाठी भारतासारख्या देशांकडून दारूगोळा आयात केला जात आहे. किंग्ज कॉलेज लंडनचे राजकीय विश्लेषक वॉल्टर लाडविग यांच्या मते, भारतीय कंपन्या थेट युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरवण्याऐवजी युरोपीय देशांना विक्री करत आहेत. त्यानंतर या देशांकडून त्यांच्या गरजेनुसार दारूगोळ्याचा वापर केला जाऊ शकतो.

संरक्षण उत्पादन क्षेत्राला नवी संधी

भारत सरकारने देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन दिल्यामुळे खासगी कंपन्यांसह सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उद्योगाची क्षमताही वाढली आहे. वाढती निर्यात भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान निर्माण करण्याची संधी देत आहे, मात्र निर्यातवाढ टिकवून ठेवण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, वेळेत पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन महत्त्वाचे ठरणार आहे.

2022 पासून रशिया-युक्रेन युद्ध

रशियाने फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनवर मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्यानंतर युद्धाला सुरुवात झाली. या संघर्षात हजारो नागरिक आणि सैनिकांचा मृत्यू झाला असून लाखो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. युद्धामुळे युरोपातील संरक्षण खर्च वाढला आणि दारूगोण व लष्करी साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.  युरोप आणि पश्चिम आशियातील वाढत्या मागणीमुळे भारतीय संरक्षण उद्योगाला जागतिक बाजारपेठेत विस्ताराची संधी मिळत आहे. दारूगोळा आणि लष्करी सुट्या भागांच्या निर्यातीत झालेली वाढ भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेतील बदल अधोरेखित करते.

Comments are closed.