T20 WORLD CUP: भारताचा चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश, टी20 विश्वचषक इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

गुरुवारी, ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात रोमांचक सामना झाला. या वेगवान आणि धावांनी भरलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवला. या विजयासह संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. यासह, टीम इंडिया टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय संघ २००७, २०१४ आणि २०२४ मध्ये अंतिम सामना खेळला होता. तसेच, इतिहासात पहिल्यांदाच, भारत गतविजेता म्हणून अंतिम फेरीत पोहोचला आहे.

भारतीय संघाने २० षटकांत २५३/७ धावांचा मोठा स्कोअर केला. यामध्ये संजू सॅमसनचा खेळ वैशिष्ट्यपूर्ण होता. ४२ चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी करत त्याने ८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. सलामीवीर अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर, इशान किशनने १८ चेंडूत ३९ धावा जोडून योगदान दिले. मधल्या फळीतील फलंदाज शिवम दुबेने २५ चेंडूत ४३ धावा केल्या, तर हार्दिक पांड्या (२७) आणि तिलक वर्मा (२१) यांनी शेवटच्या टप्प्यात संघाची गती कायम ठेवली. इंग्लंडकडून विल जॅक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, परंतु भारतीय फलंदाजांनी धावगती कायम ठेवली.

इंग्लंडने २५४ धावांचा पाठलाग सुरू केला, परंतु हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या विकेटमुळे सुरुवातीपासूनच त्यांच्यावर दबाव निर्माण झाला. जेकब बेथेलने ४८ चेंडूत १०५ धावांची शतकी खेळी करत इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले, परंतु अक्षर पटेल-शिवम दुबे यांनी घेतलेले महत्त्वाचे झेल आणि बुमराहचे १८ वे षटक (६ धावा) संघासाठी निर्णायक ठरले.

शेवटच्या षटकातही उत्साह कायम राहिला. इंग्लंडला शेवटच्या षटकात ३० धावांची आवश्यकता होती. सूर्य यादवने शिवम दुबेला गोंदाजी दिले तेव्हा शेवटच्या षटकात जेकब बेथेल धावबाद झाला आणि इंग्लंडचा विजय जवळजवळ संपुष्टात आला. जोफ्रा आर्चरने १९ धावा केल्या पण इंग्लंड ७ धावांनी कमी पडला.

भारताच्या विजयात गोलंदाजांनी मोठी भूमिका बजावली. बुमराहने ४ षटकांत ३३ धावा देत १ बळी घेतला, तर हार्दिक पांड्याने ३८ धावा देत २ बळी घेतले. या विजयासह भारताने वानखेडेवर इंग्लंडचा ३९ वर्षांचा विक्रमही मोडीत काढला. ८ मार्च रोजी अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल, जिथे संपूर्ण देश त्यांना विजयी होताना पाहण्याची वाट पाहत आहे.

Comments are closed.