भारताने चीनचे दावे फेटाळले
अरुणाचल प्रदेशच्या स्थानांना चिनी नाव देण्याची आगळीक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अरुणाचल प्रदेशच्या काही स्थानांचे नाव बदलण्याच्या चीनच्या कृतीला भारताने स्पष्टपणे फेटाळले आहे. अशाप्रकारचे दावे निराधार अन् निरर्थक आहेत आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य हिस्सा असल्याची वस्तुस्थिती त्याद्वारे बदलता येणार नसल्याचे भारताने चीनला सुनावले आहे. द्विपक्षीय संबंधांमध्ये नकारात्मक निर्माण करणारी कृत्यं चीनने टाळावीत असेही भारताने ऐकविले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक स्थानांसाठी चिनी नावांची घोषणा ड्रॅगनकडून करण्यात आली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चीनकडून भारताच्या भूमी अंतर्गत येणाऱ्या स्थानांना काल्पनिक नाव देण्याच्या कुठल्याही आगळीकीला भारत स्पष्टपणे फेटाळत असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे.
चीनच्या या कारवाया भारत-चीन द्विपक्षीय संबंधांना स्थिर आणि सामान्य करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांपासून लक्ष विचलित करत असल्याचे जायसवाल यांनी सुनावले आहे. चीन अरुणाचल प्रदेशावर दावा करत याला जंगनान किंवा दक्षिण तिबेट संबोधित आहे. चीन 1914 मधील शिमला करार आणि मॅकमोहन रेषेला ब्रिटिश साम्राज्यवादी षडयंत्र मानून फेटाळतो.
अरुणाचल प्रदेश नेहमीच देशाचा अविभाज्य भाग राहिला आहे आणि राहणार आहे. चीनकडून कुठल्याही प्रकारे नाव बदलणे किंवा खोट्या दाव्यामुळे वस्तुस्थिती बदलणार आहे. भारत स्वत:च्या सार्वभौमत्वाबद्दल कुठलीच तडजोड करणार नसल्याचे विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
चीन वारंवार अरुणाचल प्रदेशातील स्थानांची कथित चिनी नावे जारी करत असतो आणि याला प्राचीन तिबेटी क्षेत्र संबोधितो. 1914 ची मॅकमोहन रेषा ऐतिहासिक स्वरुपात वैध असून ती ब्रिटिशकालीन भारत आणि तिबेटदरम्यान सहमतीने निश्चित झाली होती आणि स्वतंत्र भारताने याला स्वत:ची सीमा म्हणून स्वीकारले आहे.
Comments are closed.