हिंदुस्थानने डाळींवरील 30% कर रद्द करावा; व्यापार कराराच्या चर्चेदरम्यान अमेरिकन सिनेटर्सचे ट्रम्प यांना पत्र

अमेरिकेने अनेक देशांशी व्यापार करार पूर्ण केला आहे. मात्र, हिंदुस्थानसोबतचा व्यापार करार अद्यापही रखडला आहे. दोन्ही बाजूंकडून काही सुधारणा अपेक्षित असल्याने कराराच्या प्रस्तावाला अंतिम स्वरुप आलेले नाही. आता हा करार लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असून वाटाघाटी आणि चर्चा सुरू आहे. अमेरिकन सिनेटरनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून हिंदुस्थानला अमेरिकन वाटाणे आणि डाळींवरील कर रद्द करण्याची विनंती केली आहे.

या पत्रात अमेरिकन सिनेटरनी हिंदुस्थान-अमेरिका व्यापार करारात कडधान्य पिकांना अनुकूल तरतुदी करण्याची मागणी केली आहे. अमेरिकन पिवळे वाटाणे आणि डाळींवरील ३०% कर भारताने काढून टाकण्याबाबत तरतुदी कराव्या, अशी विनंती सिनेटरनी ट्रम्प यांना केली आहे. नॉर्थ डकोटा आणि मोंटाना हे वाटाण्यांसह डाळींचे अव्वल उत्पादक आहेत आणि हिंदुस्थान या पिकांचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आहे, जे जागतिक वापराच्या अंदाजे २७% आहे. अमेरिका व्यापारातील असंतुलन दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असताना, अमेरिकन शेतकरी ही पोकळी भरून काढण्यास मदत करण्यास तयार आहेत.

व्यापार करारात डाळींच्या पिकांचा समावेश करण्यावर भर देण्याची सूचना पत्रात करण्यात आली आहे. मसूर, हरभरा, सुक्या सोयाबीन आणि वाटाणे या हिंदुस्थानात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डाळी आहेत, तरीही अमेरिकन डाळींवर मोठा कर लादला आहे, असे सिनेटरनी म्हटले आहे. हिंदुस्थानने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी पिवळ्या वाटाण्यांवर ३०% कर लादला. १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या या शुल्कामुळे हिंदुस्थानात उच्च दर्जाचे उत्पादन निर्यात करणाऱ्या अमेरिकन डाळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Comments are closed.