हम्पी, दिव्या यांचे ऐतिहासिक विजय, हिंदुस्थानच्या दोन खेळाडू प्रथमच उपांत्य फेरीत

हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर्स कोनेरू हम्पी व इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुख यांनी फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक देत इतिहास घडविला. या स्पर्धेची इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी या दोन हिंदुस्थानी बुद्धिबळपटूंनी केली हे विशेष! आता उपांत्य फेरीत हिंदुस्थान-चीन अशी लढत रंगणार आहे. कोनेरू हम्पीचा सामना लेई टिंगजिये हिच्याशी, तर दिव्या देशमुखचा सामना तन झोंगयीशी होणार आहे.

कोनेरू हम्पीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या सोंग युक्सिन हिचा पराभव करून ही ऐतिहासिक वाटचाल केली. 38 वर्षीय हम्पीने पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगटय़ांसह खेळताना सोंगचा पराभव केला. मग दुसऱ्या गेममध्ये 53 चालींत बरोबरी मान्य करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. वयाच्या 15व्या वर्षीच ग्रॅण्डमास्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱया हम्पीपुढे आता उपांत्य लढतीत अव्वल मानांकित चीनच्या लेई टिंगजी हिचे आव्हान असेल. हम्पीने स्वित्झर्लंडची माजी जगज्जेती अलेक्झांड्रा कोस्टेनियुक हिचा टायब्रेक्समध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता ऐतिहासिक जगज्जेतेपदापासून कोनेरू हम्पी केवळ एक-दोन विजय दूर आहे.

दुसऱया उपांत्यपूर्व लढतीत दिव्या देशमुख हिने देशसहकारी द्रोणावल्ली हरिका हिचा पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्लासिकल डावांत सामना बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकमध्ये दिव्याने हरिकावर वर्चस्व गाजवत दोन्ही डावांत (पांढऱ्या व काळय़ा मोहरांनी) विजय मिळवला. अवघ्या 19 वर्षीय दिव्याने या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सहभागात उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.

वैशालीचे आव्हान संपले

हिंदुस्थानच्या आर. वैशाली हिला उपांत्यपूर्व लढतीत तृतीय मानांकित चीनच्या तान झोंगयी हिने पराभूत केले. या पराभवासह वैशालीचा या स्पर्धेतील ऐतिहासिक प्रवास संपला. या हिंदुस्थानी खेळाडूने कझाकिस्तानच्या मेरूएर्त कमालिदेनोवा हिचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत इतिहास घडविला होता. मात्र, उपांत्यपूर्व लढतीतील पराभवासह वैशालीचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले.

Comments are closed.