भारत ब्रिटनबरोबर क्षेपणास्त्र खरेदी करारावर स्वाक्षरी करतो

पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांच्यात सविस्तर द्विपक्षीय चर्चा, पाच वर्षांमध्ये व्यापार दुप्पट करणार

वृत्तसंस्था/मुंबई

भारत आणि ब्रिटन यांच्यात महत्वाच्या क्षेपणास्त्र खरेदी करार करण्यात आला आहे. हा करार 46.80 कोटी डॉलर्सचा आहे. त्यानुसार भारताला ब्रिटनची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे मिळणार आहेत. भारताच्या दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी ही घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे नेते स्टार्मर यांच्या द्विपक्षीय चर्चा करण्यात आली. भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकत्याच झालेल्या मुक्त व्यापार कराराचा आढावा यावेळी घेण्यात आला. भारत आणि ब्रिटन यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ही जागतिक स्थैर्य आणि व्यापारवृद्धी यांच्यासाठी महत्वाची आहे, असे दोन्ही देशांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांमधील व्यापार येत्या पाच वर्षांमध्ये सध्याच्या दुप्पट करणे, हा चर्चेचा मुख्य हेतू होता. गेल्या जुलैत पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर असताना दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या वस्तूंवरील करात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे.

शांततेवर चर्चा

दोन्ही नेत्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष चर्चेत द्विपक्षीय, तसेच जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. या चर्चेत युक्रेन युद्धाचाही विषय उपस्थित झाला. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध लवकरात लवकर संपावे आणि न्यायोचित शांतता स्थापन व्हावी, अशी भारताची इच्छा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे भारत-प्रशांतीय क्षेत्रात स्थायी शांतता आणि मुक्तता रहावी, यासाठी  संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे, यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे.

भारत जागतिक शक्ती व्हावा

भारताने एक जागतिक शक्ती म्हणून समोर यावे. तसेच भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान मिळावे, अशी ब्रिटनची इच्छा आहे. सुरक्षा परिषदेत स्थायी स्थान मिळावे, अशी भारताची दीर्घकालीन इच्छा आहे, ती पूर्ण व्हावी, असे ब्रिटनला वाटते, असे प्रतिपादन स्टार्मर यांनी चर्चेनंतर केले.

कैद्याचा प्रश्न

ब्रिटनचा नागरीक असणारा जगतारसिंग जोहाल याला भारतात अटक करण्यात आली आहे. तो गेली 7 वर्षे भारताच्या बंदीवासात आहे. त्याला अद्यापही दोषी ठरविण्यात आलेले नाही. त्याच्या सुटकेचा दबाव स्टार्मर यांच्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्टार्मर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले, असे अनधिकृत वृत्त सूत्रांकडून चर्चेनंतर देण्यात आले. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

ब्रिटनची विद्यापीठे भारतात येणार

ब्रिटनच्या 9 विद्यापीठांनी भारतात त्यांच्या शाखा आणि कँपस स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचे वृत्त आहे. लँकेस्टर आणि सरे या ब्रिटीश विद्यापीठांच्या नव्या कँपसना भारतात अनुमतीपत्र देण्यात आले आहे. भारतात ब्रिटीश विद्यापीठे आपल्या शाखा मोठ्या प्रमाणात स्थापन करणार असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना भारतातच राहून जागतिक गुणवत्तेचे शिक्षण घेणे शक्य होणार आहे, असे स्टार्मर यांनी चर्चेनंतरच्या वार्तालापात स्पष्ट केले.

उद्योगपतींची भेट

ब्रिटनचे नेते स्टार्मर यांनी भारताच्या दौऱ्पात भारताच्या अनेक मान्यवर उद्योगपतींचीही भेट घेतली आहे. स्टार्मर यांच्या समवेत ब्रिटनच्या 100 औद्योगिक प्रतिनिधींचे शिष्टमंडळ भारतात आले होते. त्यातील सदस्यांची भारताच्या उद्योगक्षेत्रामील मान्यवरांशी चर्चा झाली आहे. ब्रिटनने मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करावी, अशी भारताची इच्छा आहे. भारतात सध्या गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्याने जागतिक कंपन्यांनी आपली उत्पादने भारतात करावीत, यासाठी भारताचा प्रयत्न आहे. ब्रिटनकडून त्याला प्रोत्साहन मिळत आहे.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात संधी

भारत आणि ब्रिटन यांनी संरक्षण क्षेत्रात घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन आणि तंत्रज्ञान विकास संयुक्तरित्या करण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. भारताच्या संरक्षण सामग्री खरेदीमुळे ब्रिटनमध्ये नवे रोजगार निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन स्टार्मर यांनी केले. त्यामुळे भारताशी संरक्षणसामग्री व्यवहार ब्रिटनच्या दृष्टीने लाभदायक आहेत, या मुद्द्यावर ते ब्रिटनमध्ये भर देत आहेत, अशी माहिती आहे.

विस्तृत चर्चा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कीर स्टार्मर यांच्यात व्यापक द्विपक्षीय चर्चा
  • व्यापाराप्रमाणेच संरक्षण क्षेत्रातही द्विपक्षीय संबंध भक्कम करण्याची योजना
  • ब्रिटनची अनेक विद्यापीठे भारतात आपल्या शाखा लवकरच स्थापन करणार

Comments are closed.