जीडीपी क्रमवारीत भारत सहाव्या स्थानावर घसरला आहे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मूल्यांकन

वृत्तसंस्था/नवीदिल्ली

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) ताज्या जीडीपी क्रमवारीत भारताची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक मानला जात असतानाच देशाच्या क्रमवारीला धक्का बसला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे कमजोरी हे यामागील मुख्य कारण मानले जाते. गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये भारत पाचव्या क्रमांकावर होता. त्यावेळी भारताचा जीडीपी 3.5 ट्रिलियन डॉलर्स आणि ब्रिटनचा 3.4 ट्रिलियन डॉलर्स होता. पण आता ब्रिटनने भारताला मागे टाकले आहे.

आयएमएफच्या जीडीपी क्रमवारीत भारताची एका स्थानाने घसरण झाली असून, तो गेल्यावर्षीच्या पाचव्या स्थानावरून जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आयएमएफच्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये भारताचा जीडीपी अंदाजे 3.92 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, तर ब्रिटनची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत आणि जपानची अर्थव्यवस्था 4.44 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. आयएमएफ सर्व देशांचा जीडीपी डॉलर्समध्ये मूल्यांकित करत असते. आयएमएफच्या 2026 च्या क्रमवारीनुसार, भारताचा जीडीपी 4.15 ट्रिलियन डॉलर्स, ब्रिटनचा 4.26 ट्रिलियन डॉलर्स, जपानचा 4.38 ट्रिलियन डॉलर्स, जर्मनीचा 5.45 ट्रिलियन डॉलर्स, चीनचा 20.85 ट्रिलियन डॉलर्स आणि अमेरिकेचा 32.38 ट्रिलियन डॉलर्स असण्याचा अंदाज आहे.

Comments are closed.