IND Squad For SL Test: विकेट्स घेतल्या….धावा केल्या, तरी निवड झाली नाही; 'या' खेळाडूंसोबत झाला अन्याय!

मंगळवारी (28 जुलै) श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील या संघात रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले, तर सारांश जैनची पहिल्यांदाच वरिष्ठ संघात निवड झाली आहे. विशेष बाब म्हणजे, देशांतर्गंत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करूनसुद्धा काही खेळाडूंची मात्र पुन्हा एकदा निराशा झाली आहे. ते कोण, याविषयी जाणून घेऊ.

कमनशिबी ठरलेल्या या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानी वेगवान गोलंदाज औकीब नबी आहे. जम्मू-काश्मिरच्या या खेळाडूने गेल्या रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 60 विकेट्स घेतल्या. त्याच्या या धमाकेदार कामगिरीमुळे संघाने इतिहासात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर त्याची अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात संघात निवड झाली होती, मात्र आता त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

सरफराज खानलाही कसोटी संघातून वगळले आहे. त्याने भारतासाठी सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 37.10 च्या सरासरीने 371 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2024 मध्ये खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या कसोटी मालिकेनंतर त्याची निवड करण्यात आलेली नाही.

मोहम्मद शामिकाडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. शमी चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मात्र त्याच्या फिटनेसमुळे अडथळा येत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी राष्ट्रीय संघाचे दार जवळपास बंद झाल्यासारखेच आहे.

शमीनंतर आणखी एका बंगालच्या गोलंदाजाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहबाज अहमद या फिटकीपटूने रणजी ट्रॉफी 2026 मध्ये प्रभावी कामगिरी केली होती. त्याने आठ सामन्यांमध्ये 16.54 च्या सरासरीने 39 विकेट्स घेतल्या होत्या. तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शमीच्याआधी पाचव्या स्थानी होता. तसेच त्याने 72 प्रथम श्रेणी डावांमध्ये 21.35 सरासरीने 142 विकेट्स घेतल्या आहेत. (India squad for sri lanka test series 2026 with auqib nabi this players ignored)

श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना 15 ऑगस्टपासून गॉल येथे खेळला जाणार आहे. ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2025-27 चा भाग आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह*, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन. (*फिटनेसवर आधारित)

Comments are closed.