भारत आपल्या मित्र राष्ट्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे!
आसियान शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हर्च्युअल प्रणालीद्वारे संबोधन
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 47 व्या आसियान शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने संबोधित केले. भारत आणि आसियान एकत्रितपणे जगातील 25 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. यावरून भारत आणि इतर आसियान देश किती मजबूत आहेत हे दिसून येते. या देशांचे भारताशी दृढ आणि ऐतिहासिक संबंध असल्याने सर्व मित्रदेशांसोबत भारत ठामपणे उभा असल्याचे या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचे सुरुवातीलाच अभिनंदन केले. तसेच थायलंडच्या महाराणींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. ‘आसियान’चा नवीन सदस्य म्हणून मी तिमोर-लेस्टेचे स्वागत करतो, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले. आसियान हा भारताच्या ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’चा आधारस्तंभ असून प्रादेशिक स्थिरता व समृद्धीसाठी दोघांमधील सहकार्य महत्त्वाचे असल्यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला.
भारत आणि आसियान हे ‘ग्लोबल साऊथ’चे सारथी असल्याने संकटाच्या वेळी भारत आपल्या आसियान मित्र देशांसोबत खंबीरपणे उभा आहे. भारत कोणत्याही परिस्थितीत आपल्या कोणत्याही मित्र देशांना एकटे सोडत नाही. जर एखाद्या मैत्रीपूर्ण देशाला आपली गरज असेल तर भारत त्यांच्यासोबत सदैव उभा राहील, असे ते पुढे म्हणाले. भारत आणि आसियान एकत्रितपणे जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही केवळ भूगोलच नाही तर दृढ ऐतिहासिक संबंध आणि सामायिक मूल्येदेखील जपतो. आम्ही ग्लोबल साऊथचा भाग आहोत. आम्ही केवळ व्यापार संबंधच नाही तर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची हमीही पंतप्रधानांनी दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांची परिषदेला उपस्थिती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेसुद्धा क्वालालंपूर येथे सुरू झालेल्या 47 व्या आसियान शिखर परिषदेसाठी मलेशियात पोहोचले होते. व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांचा हा पहिलाच अधिकृत आशिया दौरा असल्याचे मानले जात आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात अमेरिकेच्या सक्रिय सहभागाचे हे लक्षण म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेच्या टॅरिफ आणि व्यापार धोरणांचा परिणाम या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थांवर ताणतणाव निर्माण करत असताना ही शिखर परिषद होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून ‘आसियान’ची तटस्थता आणि सर्वसमावेशकतेची चाचणी होणार असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.
तिमोर-लेस्टे आसियानचे 11वे सदस्य
यावर्षीची शिखर परिषद अनेक प्रकारे ऐतिहासिक मानली जात आहे. पूर्व तिमोर-लेस्टेला आसियानचा 11 वा सदस्य देश म्हणून औपचारिकरित्या मान्यता देण्यात आली आहे. 26 वर्षांनंतर हा गटाचा पहिला विस्तार आहे. सुमारे 14 लाख लोकसंख्या असलेला हा छोटासा देश आता आसियानच्या व्यापार, गुंतवणूक आणि विकास चौकटीचा भाग बनणार आहे.
Comments are closed.