भारताने बांगलादेशच्या राजदूताला बोलावले

सीमेवरील कुंपणाच्या मुद्द्यावरून दोन्ही देशात तणाव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सीमेवरील कुंपणावरून दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाबाबत भारत सरकारने सोमवारी बांगलादेशचे राजदूत नुरुल इस्लाम यांना पाचारण केले होते. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने या मुद्यावर भारतीय राजदूत प्रणय वर्मा यांना बोलावल्यानंतर एक दिवसानंतर ही घटना घडली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावल्यानंतर नूरुल इस्लाम साउथ ब्लॉकमधून बाहेर पडताना दिसले. भारत द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करून सीमेवर पाच ठिकाणी कुंपण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बांगलादेशने केल्यानंतर भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या सीमेवर तणाव वाढला आहे.

बांगलादेशच्या सैन्याने गोडालिया नदीच्या काठावर 5 किलोमीटरच्या भूभागावर कब्जा केल्याचा दावा बीजीबीच्या एका कमांडरने काही दिवसांपूर्वी केला होता. या वक्तव्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर बीजीबी आणि बीएसएफच्या अधिकाऱ्यांची फ्लॅग मीटिंग झाली होती. बीजीबीच्या अधिकाऱ्याने भ्रम पसरविणारे वक्तव्य केल्याचे बीएसएफने स्पष्ट केले होते. बांगलादेशचे अंतर्गत व्यवहार सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जहांगीर आलम चौधरी यांच्या मते, चापाइनवाबगंज, नौगाव, लालमोनिरहाट आणि तीन बिघा कॉरिडॉरसह पाच भागात संघर्ष सुरू झाला आहे.

भारत द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करत भारत-बांगलादेश सीमेवर 5 ठिकाणी कुंपण उभारण्याचे काम करत असल्याचा आरोप बांगलादेशने केल्यानंतर बांगलादेश सरकारने वर्मा यांना पाचारण करत त्यांच्यासमोर भूमिका मांडली. बांगलादेशचे विदेश सचिव जशीम उद्दीन यांच्यासोबत वर्मा यांची बैठक सुमारे 45 मिनिटांपर्यंत चालली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारकडून या चर्चेसंबंधी कुठलेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आले नसले तरी अधिकाऱ्यांनी भारतीय राजदूताला पाचारण करण्यात आले होते याची पुष्टी दिली आहे.

चीन-पाकपेक्षाही भारताची बांगलादेशशी सीमा मोठी

सीमेच्या लांबीच्या बाबतीत पाहिले तर बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा शेजारी आहे. देशाच्या गृह मंत्रालयाच्या मते, भारताची बांगलादेशशी असलेली सीमा 4,096.7 किलोमीटर लांबीची आहे. चीनशी आपली सीमा 3,488 किलोमीटर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान असून त्याच्याशी भारताची सीमा 3,323 किलोमीटर आहे. भारताची बांगलादेशशी असलेली 4,096.7 किलोमीटर लांबीची सीमा पाच राज्यांमधून जाते. ही राज्ये पश्चिम बंगाल (2,216.70 किमी), आसाम (263 किमी), मेघालय (443 किमी), त्रिपुरा (856 किमी) आणि मिझोराम (318 किमी) ही आहेत.

Comments are closed.