कसोटी संघाच्या कोचिंगवर प्रश्नचिन्ह; या दिग्गजाकडे बीसीसीआयचा प्रस्ताव, गंभीरच्या भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह
भारतीय क्रिकेट संघाने अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला 0-2 ने कसोटी मालिका गमवावी लागली होती. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतही भारताचा क्लीन स्वीप झाला. या सलग अपयशानंतर बीसीसीआयमध्ये अस्वस्थता वाढली असून, PTI च्या वृत्तानुसार बोर्डातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनौपचारिकरीत्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधत ते कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास इच्छुक आहेत का, याची विचारणा केली होती.
मात्र, सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कसोटी संघाचे कोचपद स्वीकारण्यास कोणतीही उत्सुकता दाखवलेली नाही. ते सध्या बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये क्रिकेट प्रमुख म्हणून कार्यरत असून, या भूमिकेतच समाधानी आहेत. सध्या भारतीय संघाचे प्रशिक्षक 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत करारबद्ध आहेत. मात्र, कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे या निर्णयाचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो. तरीही, लक्ष्मण यांनी स्पष्टपणे कोचपदाबाबत रस नसल्याचे संकेत दिले आहेत.
PTI च्या अहवालानुसार, आता सर्व काही 2026 च्या टी20 विश्वचषकातील भारतीय संघाच्या कामगिरीवर अवलंबून असेल. जर भारताने हा विश्वचषक जिंकला किंवा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, तर BCCI आपला निर्णय बदलू शकते. यादरम्यान, भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (WTC) श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड दौरा आणि जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
दरम्यान, सध्याच्या प्रशिक्षकांच्या कार्यकाळात काही खेळाडू स्वतःला असुरक्षित समजू लागल्याचे बोलले जात आहे. राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात खेळाडूंच्या भूमिका स्पष्ट होत्या आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता. मात्र, अलीकडे शुभमन गिलला उपकर्णधार बनवून टी20 संघात संधी देण्यात आली, परंतु खराब कामगिरीमुळे त्याला 2026 च्या टी20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले. अशा अचानक निर्णयांमुळे संघातील इतर खेळाडूंमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी स्पर्धांनंतर आयपीएल होणार असून, त्यानंतर बीसीसीआयकडे वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळे प्रशिक्षक की तिन्ही फॉरमॅटसाठी एकच प्रशिक्षक ठेवायचा, यावर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ असेल. मात्र, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचा अर्थ असा की, बीसीसीआयने कसोटी संघासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध आतापासूनच सुरू केला आहे.
Comments are closed.