सिडनीत ‘RO-KO’चा ‘हिट’शो! रोहित शर्मा आणि विराट कोहलीसमोर ऑस्ट्रेलियाची शरणागती


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील वनडे मालिकेचा शेवट एका दमदार विजयाने केला. हा विजय अधिक खास ठरला, कारण त्यामागे संघातील दोन सर्वात मोठ्या स्टार खेळाडूंचा मोठा वाटा होता. सिडनीत खेळलेल्या मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनी एकतर्फा पराभव केला. या विजयानंतर रोहित शर्माच्या जबरदस्त खेळीने आणि विराट कोहलीच्या दमदार अर्धशतकाने सर्वांचे लक्ष वेधले. दोघांनी मिळून 168 धावांची भागीदारी करत संघाला सहजपणे 237 धावांचे लक्ष्य गाठून दिले. त्याचबरोबर युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने अफलातून गोलंदाजी करत 4 बळी घेत संघाच्या विजयाची भक्कम पायाभरणी केली.

विराट-रोहित शर्मा चमकले…

237 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने 69 धावांवर शुभमन गिलचा विकेट गमावला. गिल फक्त 24 धावा करून माघारी परतला. संपूर्ण मालिकेत त्याचा फॉर्म निराशाजनक राहिला आणि तीन डावांत तो केवळ 43 धावाच करू शकला. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने जबाबदारी सांभाळत भारताला विजयापर्यंत पोहोचवले.

रोहित शर्माने नाबाद 121 धावांची खेळी खेळली. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील 33वे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 50वे शतक ठरले. दुसऱ्या विकेटसाठी त्याने विराट कोहलीसोबत 168 धावांची भागीदारी केली. वनडे क्रिकेटमध्ये हा 19वा प्रसंग होता, जेव्हा विराट आणि रोहित यांनी 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. या बाबतीत आता त्यांच्यापेक्षा पुढे केवळ सचिन तेंडुलकर–सौरव गांगुली आणि कुमार संगकारा–तिलकरत्ने दिलशान ही जोडी आहे.

शुभमन गिलचा पहिला विजय

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शुभमन गिलला नवीन वनडे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिले दोन सामने गमावले. पहिला सामना 7 विकेटने आणि दुसरा सामना अॅडिलेडमध्ये 2 विकेटने. अखेर सिडनीत गिलने कर्णधार म्हणून आपला पहिला विजय नोंदवला आणि मालिकेचा शेवट विजयाने केला.

हर्षित राणाचा विकेट्सचा ‘चौकार’

त्याआधी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडसह चांगली सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावा केल्या. भारताला सिराजने पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियन डाव थोडासा डळमळीत झाला. पण, रेनशॉ आणि अॅलेक्स कॅरी यांनी चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली, जी हर्षित राणाने अॅलेक्स कॅरीला बाद करून मोडली. त्यानंतर रेनशॉ अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. रेनशॉ व्यतिरिक्त, मार्शने 41, मॅथ्यू शॉर्ट 30, ट्रॅव्हिस हेड 29, अॅलेक्स कॅरी 24, कूपर कॉनोली 23, नॅथन एलिस 16, मिचेल स्टार्क 2 आणि मिचेल ओवेन 1 धावा केल्या. भारताकडून, हर्षितच्या चार विकेट्स व्यतिरिक्त, वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्स घेतल्या, तर सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आणखी वाचा

Comments are closed.