भारत 'जीपीएस'मध्ये आत्मनिर्भर होणार

स्वदेशी ‘नाविक’चे पूर्ण कार्यान्वयन आता लवकरच

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आता ‘जीपीएस’मध्ये आत्मनिर्भर होण्याच्या स्थितीत आला आहे. स्वदेशनिर्मित ‘नाविक’ (एनएव्हीआयसी) ही यंत्रणा आता सज्ज झाली आहे. इस्रोयने नुकत्याच प्रक्षेपित केलेल्या ‘एनव्हीएस-03’ या उपग्रहाची कक्षा उंचाविण्याचा तिसरा आणि अंतिम उपक्रम यशस्वी झाला आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून 30 ऑक्टोबर 2026 ला करण्यात आले आहे.

इस्रोने केलेल्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ‘एनव्हीएस-03’ या उपग्रहाला प्रथम कक्षेत स्थापन करण्यात आले. नंतर टप्प्याटप्याने त्याची कक्षा उंचावण्यात आली आहे. आता हा उपग्रह त्याच्या पूर्वनिर्धारीत भूस्थिर कक्षेत स्थापित झाला आहे. ही कक्षा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 34,594.9-35,842.6 किलोमीटर अंतरावर आहे. या कक्षेतील उपग्रह पृथ्वी स्वत:भोवती ज्या वेगाने फिरते, त्याच वेगाने पृथ्वीभोवती फिरतो. त्यामुळे तो अवकाशात एकाच स्थानी स्थिर असल्याप्रमाणे कार्यरत राहू शकतो.

एनव्हीएस-03 या उपग्रहाला आता भूस्थिर कक्षेत स्थापन करण्यात आल्याने भारताने स्वदेशनिर्मित जीपीएस व्यवस्था कार्यरत करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल यशस्वीरित्या टाकले आहे. लवकरच हा उपग्रह त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करु लागणार असून त्यानंतर भारताची स्वदेशनिर्मित जीपीएस व्यवस्था कार्यरत होणार आहे. याला काही वेळ लागणार आहे. तथापि, भारताची संपूर्ण पायाभूत सज्जता आता झाली आहे. भारतची ही यंत्रणा अमेरिकेच्या ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ म्हणजेच जीपीएसच्या तोडीस तोड आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

या यंत्रणेचा उपयोग काय…

या उपग्रहाद्वारे प्रक्षेपित सिग्नल्स स्मार्टफोन्स, वाहने, नौका, रेल्वे आणि इतर साधने यांचे स्थान निश्चित करण्यासाठी आणि त्यांना प्रवासात मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. भारताचे संपूर्ण क्षेत्रफळ या उपग्रहाच्या कार्यकक्षेत येणार आहे. तसेच भारताच्या चतु:सीमांच्या पलिकडे 1 हजार 500 किलोमीटरपर्यंत त्याची कार्यकक्षा आहे. अर्थात, या व्यवस्थेत काही समस्याही उद्भवू शकतात. आण्विक घड्याळे दुर्बल होणे ही एक समस्या आहे. त्यामुळे या सर्व शक्यतांवर मात करुनच ही व्यवस्था कार्यरत केली जाणार असून त्यामुळे त्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. पण तो फार अधिक असणार नाही.

यंत्रणेचे महत्त्व काय…

सध्या जीपीएससाठी भारत पूर्णत: विदेशी उपग्रह आणि सेवांवर अवलंबून आहे. पण इस्रोच्या या प्रयत्नांमुळे भारताला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्वयंपूर्णता प्राप्त होऊ शकते. त्यामुळे विदेशांवरचे आपले अवलंबित्व बरेच कमी होणार आहे. परिणामी, देशाची सुरक्षा व्यवस्थाही अधिक दृढ होईल. कारण देशातील नॅव्हिगेशन पूर्णत: विदेशी सेवांवर अवलंबून राहिले, तर युद्धांसारख्या प्रसंगांमध्ये हे परावलंबित्व घातक ठरू शकते. संपर्क साधनांच्या संदर्भात परावलंबित्व हे नेहमीच धोक्यांना निमंत्रण देणारे असते. भारत नॅव्हिगेशनसाठी उपयुक्त जीपीएस तंत्रज्ञानात आत्मनिर्भर झाल्यास कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी त्याला धोका होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. इस्रोने हे तंत्रज्ञान देशातच विकसित करण्याच्या दृष्टीने मोठी प्रगती केली असून या पुढच्या काही काळात ही प्रगती देशवासियांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल आणि भारताचे विदेशांवरील अवलंबित्व बरेच कमी होईल. म्हणून ही यंत्रणा भारतासाठी आवश्यक ठरली आहे.

आणखी परीक्षणे केली जाणार

उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिरावला असला, तरी इस्रोला एक परिपूर्ण जीपीएस यंत्रणा निर्माण करण्यासाठी आणखी काही महत्त्वाची परीक्षणे करावी लागणार आहेत. हा उपग्रह पूर्णत: कार्यान्वित करण्यासाठी आणि तो सेवारत स्थितीत आणण्यासाठी आणखी काही बाबींची पूर्तता करावी लागेल, असे स्पष्ट केले गेले.

इस्रोची कौतुकास्पद प्रगती

ड भारताला जीपीएसमध्ये आत्मनिर्भर करण्याचा इस्रोने केला आहे निर्धार

ड उपग्रहाची कक्षा उंचाविण्याचा उपक्रम यशस्वी, आणखी परीक्षणेही होणार

ड जीपीएसमध्ये आत्मनिर्भरता देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची

 

 

Comments are closed.