आज युद्धाचे मॉकड्रिल! मुंबईसह राज्यातील 16 शहरांमध्ये सायरन वाजणार… ब्लॅक आऊट होणार

पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या कठोर भूमिकांमुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तामधील संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठकांवर जोर आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्या 7 मे रोजी देशभरात सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रिल घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यभरात 16 ठिकाणी सायरन वाजणार असून ब्लॅकआऊट करण्यात येणार आहे.


शत्रू राष्ट्राने जर हल्ला केलाच तर त्यापासून बचाव करण्यासाठी हा युद्धसराव केला जाणार असून 1971 च्या हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच देशात अशा प्रकारचे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.

देशभरातील 244 जिह्यात मॉकड्रिलच्या तयारीला सुरुवात करण्यात आली. या ठिकाणांना केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरी संरक्षण जिल्हे म्हणून घोषित केले आहे. आज दिल्लीत गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गृहसचिव गोविंद मोहन यांनी मॉकड्रिलच्या तयारीचा आढावा घेतला. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा, गुजरात, जम्मू-कश्मीर, पंजाब, ओडिशा, बिहार, आसाम, झारखंड, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, लक्षद्वीप, कर्नाटक, केरळ, मेघालय, मणिपूर यांसह चंदिगड, छत्तीसगड, दादरा-नगर-हवेली, दमण-दीव, पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेश, दिल्ली, अंदमान-निकोबार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि उत्तराखंड येथे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे.

डिसिल्व्हा शाळेत वाजला भोंगा

मॉकड्रिलची रंगीत तालीम म्हणून आज रेल्वे पोलिसांनी विविध स्थानकांवर गस्त घातली. दादरच्या डिसिल्व्हा शाळा परिसरात भोंगा वाजवला गेला. संवेदनशील परिसरात स्थानिक पोलीस, निमलष्करी दलाचे जवान हे मॉकड्रिल करणार आहेत, तर पूर्व उपनगरातील अणुशक्ती नगर येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

असे होणार मॉकड्रिल

  • प्रथम श्रेणीत मुंबई, उरण आणि तारापूर येथे मॉकड्रिल होईल. मुंबई हे देशाचे प्रमुख आर्थिक केंद्र असून उरण येथे मालवाहतूक करणारे जेएनपीटी बंदर आहे. तर तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प असल्याने या तीन ठिकाणांचा पहिल्या श्रेणीत संवेदनशील ठिकाणे म्हणून समावेश करण्यात आला आहे.
  • दुसऱ्या श्रेणीत ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत आणि पिंपरी-चिंचवड.
  • तिसऱ्या श्रेणीत संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे युद्धसराव होणार आहे.

सीमेवर हिंदुस्थानचा युद्धसराव

देशभरात 7 मे रोजी युद्धाचे मॉकड्रिल होणार असताना दुसरीकडे पाकिस्तानमलगच्या सीमेवर वाळवंटी भागात हिंदुस्थान युद्धसराव करणार असल्याचे वृत्त आहे. हवाई दलाच्या अधिकाऱयांनी एनआयला याची माहिती दिली आहे. राफेल, मिराज 2000, सुखोई 30 या प्रमुख लढाऊ विमानांसह इतर लढाऊ विमाने या युद्धसरावात सहभागी होणार आहेत. युद्ध सरावादरम्यान शत्रूच्या ताफ्यातील लढाऊ विमानांचा अचूक लक्ष्यभेद, शत्रूच्या तळांवर निशाणा, आपत्कालीन स्थितीत पायलटने घ्यायची खबरदारी अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्यात येणार आहे.

नेमके काय होणार…

  • आपल्या परिसरात मोठ्या आवाजाचे सायरन वाजू शकतात. हवाई हल्ल्याचा इशारा देण्यासाठीची ही सूचना असेल.
  • विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल. हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची ठिकाणी शत्रूच्या नजरेस पडू नयेत यासाठीची ही खबरदारी असेल.
  • काही भागांतून नागरिकांना सुरक्षितपणे हलवण्याचा सराव केला जाईल.
  • काही ठिकाणी प्रवेशबंदी केली जाऊ शकते, तर काही शहरांमध्ये वाहतूक वळवली जाऊ शकते.
  • सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, होमगार्ड, एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक आणि कॉलेज विद्यार्थ्यांना सरावात सामावून घेणार.

Comments are closed.