भारत चिनाबचे पाणी बियास नदीकडे वळवणार आहे.
पाकिस्तानला चिंता : सिंधू कराराशी आहे कनेक्शन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हिमाचल प्रदेशातील चिनाब-व्यास लिंक टनेल प्रकल्प भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणणारा ठरला आहे. लाहौल-स्पीतीतील कोकसर परिसरात चिनाब नदीच्या चंद्रा उपनदीतील पाणी व्यास नदीच्या खोऱ्याकडे वळविण्याचा हा प्रकल्प आहे. एनएचपीसीच्या अधिकृत निविदेनुसार या प्रकल्पातीतल कामांमध्ये बॅरेज, नदीचे पाणी वळविण्याची व्यवस्था, वॉटर डायव्हर्शन टनेल, पॉवर इनटेक आणि संबंधित कामांचा समावेश आहे. प्रकल्पाचा अंदाजित खर्च 2352 कोटी रुपये आहे.
कोकसर येथे चंद्रा नदीवर सुमारे 19 मीटर उंच बॅरेज उभारण्याची योजना आहे. त्यातून पाण्याचा काही भाग वळवून पर्वतरांगांमधून बोगद्याद्वारे व्यास खोऱ्यात नेण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या अधिकृत निविदेत जलवळवणी बोगदा आणि आउटफॉल स्ट्रक्चरचा स्पष्ट उल्लेख आहे. या प्रकल्पाचा उद्देश केवळ नदी जोडणी नसून पाणी व्यवस्थापन, सिंचन आणि जलविद्युत निर्मितीशी संबंधित लाभ मिळविणे असणार आहे.
पाकिस्तानची चिंता नेमकी काय?
पाकिस्तानने जून महिन्यात या प्रकल्पावर अधिकृत आक्षेप नोंदविला. चिनाबचे पाणी व्यास नदी प्रणालीकडे वळविणे हे सिंधू जल कराराचे उल्लंघन असल्याचा दावा करत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय जलकायद्याचा संदर्भ दिला. चिनाब ही सिंधू नदी प्रणालीतील पश्चिमेकडील नदी आहे. त्यामुळे तिच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची भारताची क्षमता भविष्यात पाकिस्तानच्या पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम करू शकते अशी पाकिस्तानची भूमिका आहे.
सिंधू जल करारात चिनाबचे स्थान
1960 च्या सिंधू जल करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब या तीन पश्चिमेकडील नद्या पाकिस्तानच्या वापरासाठी मुख्यत्वे राखण्यात आल्या. तर रावी, व्यास आणि सतलज या पूर्वेकील नद्यांचा भारताला वापर देण्यात आला. मात्र भारताला पश्चिमेकडील नद्यांवर काही विशिष्ट वापराचे अधिकारही कराराने दिले आहेत.
एप्रिल 2025 नंतर परिस्थिती बदलली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. यामुळे चिनाबसारख्या पश्चिमेकडील नद्यांवरील भारताच्या जलवस्थापन प्रकल्पांकडे पाकिस्तान अधिक संवेदनशीलतेने पाहत आहे. या प्रकल्पामुळे भारताला पाण्याचा काही प्रवाह वळवण्याची पायाभूत क्षमता मिळू शकते. प्रकल्पामुळे चंद्रा नदीचे पाणी किती प्रमाणात वळविले जाणार, कोणत्या ऋतूत वळविले जाणार आणि त्याचा डाउनस्ट्रीम प्रवाहावर किती परिणाम होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
भारतासाठी संभाव्य फायदे
?हिमाचलमधील जलसंपत्तीचा अधिक कार्यक्षम वापर
?व्यास खोऱ्यात अतिरिक्त पाण्याची उपलब्धता
?सिंचनासाठी पाण्याचा वापर वाढणार
?जलविद्युत प्रकल्पानां पाण्याची उपलब्धता वाढणार
?पाण्याच्या हंगामी प्रवाहाचे व्यवस्थापन
?हिमालयीन नदीखोऱ्यांमधील पाणी व्यवस्थापनाची क्षमता
Comments are closed.