9 वर्षांनंतर भारत श्रीलंकेत खेळणार कसोटी मालिका, सामन्यांच्या तारखा आल्या समोर; जाणून घ्या संपूर्ण शेड्युल
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. ९ वर्षांनंतर टीम इंडिया श्रीलंकेत कसोटी मालिका खेळणार आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात १५ ऑगस्टला पहिल्या कसोटी सामन्याने होईल. २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेत शेवटचा कसोटी सामना खेळला होता, तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी मालिकेत श्रीलंकेचा व्हाईटवॉश (सूपडा साफ) केला होता.
आता टीम इंडिया शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ९ वर्षांनंतर श्रीलंकेच्या भूमीवर कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना गॉल येथे १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान खेळवला जाऊ शकतो. यानंतर २३ ऑगस्टपासून दुसरा कसोटी सामना खेळवला जाऊ शकतो. दरम्यान, दुसऱ्या कसोटीचे मैदान (वेन्यू) अजून समोर आलेले नाही, परंतु मध्य कोलंबोमधील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाऊ शकतो.
श्रीलंकेविरुद्धची ही दोन सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) भाग असेल. मात्र, श्रीलंका क्रिकेट (SLC) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या दोन्ही बोर्डांनी अधिकृतपणे सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. ‘क्रिकबझ’ने आपल्या रिपोर्टमध्ये या सामन्यांच्या तारखा आणि मैदानांची माहिती दिली आहे. यापूर्वी १८ मे रोजी क्रिकबझने एका रिपोर्टमध्ये माहिती दिली होती की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान होण्याची शक्यता आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे कि, टीम इंडिया श्रीलंकेत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेव्यतिरिक्त तीन सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळू शकते. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेचे संकेत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीही दिले होते. सैकिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “तीन सामन्यांसाठी विनंती आली आहे आणि आम्ही लवकरच या कार्यक्रमाला अंतिम रूप देऊ.”
Comments are closed.