भारत ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करणार, वनडे- टी 20 मालिका खेळणार, BCB ची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाने गेल्या वर्षी बांगलादेशचा दौरा स्थगित केला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या घोषणेनुसार ऑगस्ट-सप्टेंबर 2026 मध्ये भारत बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी 20 सामन्यांची मालिका खेळली जाईल.

बांगलादेशात हिंदूंविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध भारतात केला जात आहे. बांगलादेशी खेळाडूंच्या आयपीएलमधील सहभागावरही टीका होत आहे. बीसीसीआयनं त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. हे सर्व सुरु असताना दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट ऑपरेशन्स इन्चार्ज शहरियार नफीस यांनी क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार, “बांगलादेश आणि भारत यांच्यातील जी मालिका आधी स्थगित करण्यात आली होती, त्याचं पुन्हा वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे.”

भारताचा बांगलादेश दौरा 2026

रिपोर्टनुसार त्यांनी सांगितले की, भारतीय संघ आता 28 ऑगस्टला बांगलादेशमध्ये दाखल होईल. एकदिवसीय सामने 1, 3 आणि 6 सप्टेंबर रोजी खेळले जातील. टी 20 आंतरराष्ट्रीय सामने 9, 12 आणि 13 सप्टेंबर रोजी खेळले जातील.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी 2026 वर्षातील  बांगलादेशच्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली, ज्यात पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यासोबत तिन्ही फॉरमॅटमध्ये द्विपक्षीय मालिकांचा समावेश आहे.

बांगलादेशचे 2026 चं वेळापत्रक

पाकिस्तान 9 मार्च रोजी तीन एकदिवसीय सामन्यांच्या दौऱ्यासाठी बांगलादेशमध्ये पोहोचेल. 12 ते 16 मार्च दरम्यान सामने आयोजित केले जातील. एप्रिल-मे मध्ये न्यूझीलंड संघ बांगलादेशला येईल. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. त्यानंतर दोघांमध्ये तितक्याच सामन्यांची टी 20 मालिका होईल.

त्यानंतर पाकिस्तान दोन कसोटी सामन्यांसाठी पुन्हा बांगलादेशचा दौरा करेल. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. पहिला कसोटी सामना 8-12 मे आणि दुसरा कसोटी सामना 16-20 मे रोजी खेळला जाईल.

जूनमध्ये ऑस्ट्रेलिया बांगलादेश दौऱ्यावर येईल,5 जून रोजी 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात होईल. त्यानंतर दोघांमध्ये 15 ते 20 जून दरम्यान 3 सामन्यांची टी 20 मालिका होईल.

सप्टेंबरमध्ये भारताचा पार पडल्यानंतर बांगलादेश वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.  पहिला कसोटी सामना 28 ऑक्टोबर-1 नोव्हेंबर दरम्यान, तर दुसरा कसोटी सामना 5-9 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाईल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.