बुमराचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून

टीम इंडियाचा युवा कसोटी कर्णधार शुभमन गिल सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पूर्णपणे उत्साहित आहे. ‘‘विराट कोहलीच्या नेतृत्वात मला खूप काही शिकायला मिळाले. जसप्रीत बुमरा टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यामुळे मालिकेतील परिस्थिती आणि त्याचा फिटनेस यावरून बुमराच्या खेळण्याबाबत रणनीती ठरविली जाईल,’’ असे शुभमन गिलने सांगितले.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर दिनेश कार्तिकने घेतलेल्या विशेष मुलाखतीत शुभमनने आपले मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला,  ‘‘कर्णधार म्हणून संघनिवड समितीने माझ्यावर कोणताही दबाव टाकलेला नाही. गौतम भाई आणि अजित सर यांनी मला स्पष्ट सांगितले की, संघाचे नेतृत्व सांभाळताना कुठलेही दडपण घेऊ नकोस. मात्र कर्णधार म्हणून माझ्या स्वतःच्या अपेक्षा मात्र नक्कीच आहेत. विराट कोहलीचा मैदानावरील आक्रमक वावर मला खूप भावला. तो क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांशी सतत संवाद साधत असतो. रोहित शर्माची रणनीतीहीदेखील ठाम आणि प्रभावी असते. यातून मला बराच अनुभव मिळाला आहे. त्याचा उपयोग संघाचे नेतृत्व करताना नक्की होईल,’’ असे गिलने सांगितले.

'तरुण संघ'ला भविष्य तेजस्वी

युवा खेळाडूंबाबत शुभमन गिलने सकारात्मक दृष्टिकोन मांडला. ‘‘माझ्या पदार्पणावेळी बहुतांश खेळाडू अनुभवी होते, पण आता मी कर्णधार म्हणून जबाबदारी घेत असताना संघात अनेक युवा चेहरे आहेत. पुढील 10-12 वर्षे हा संघ या तरुण खेळाडूंवरच अवलंबून असेल आणि अशा ऊर्जावान खेळाडूंना सांभाळणे खूप सोपे आणि प्रेरणादायी ठरते,’’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही शुभमन गिलने दिली.

Comments are closed.