भारत-यूके कराराचे अत्यंत महत्त्व आहे

ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर यांच्याकडून भलावण

वृत्तसंस्था/ मुंबई

ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर यांच्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्याला बुधवारी प्रारंभ झाला आहे. मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. नुकताच भारत आणि ब्रिटन यांनी मुक्त व्यापार करार केला असून तो दोन्ही देशांच्या संबंधांच्या दृष्टीने अतिमहत्वाचा आहे, अशी भलावण स्टार्मर यांनी केली आहे. ब्रिटन युरोपियन महासंघातून बाहेर पडल्यानंतरचा हा आम्ही केलेला सर्वात मोठा करार आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी या कराराच्या महतीचे वर्णन केले.

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कीर स्टार्मर, उद्योगपतींच्या एका परिषदेत सहभागी झाले. परिषदेसमोर भाषण करताना त्यांनी या कराराचे महत्व स्पष्ट केले. स्टार्मर यांच्यासमवेत एक मोठे प्रतिनिधीमंडळ भारताच्या दौऱ्यावर आले आहे. आजवर ब्रिटनच्या कोणत्याही नेत्याने इतके मोठे प्रतिनिधीमंडळ भारतात आणले नव्हते, अशीही वस्तुस्थिती स्टार्मर यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केली.

ब्रेक्झिटनंतर भारत महत्वाचा भागीदार

ब्रिटनने काही वर्षांपूर्वी युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला ‘ब्रेक्झिट’ असे संबोधले जाते. या निर्णयानंतर आता आम्ही कोणत्याही देशाशी आभच्या पद्धतीने करार करण्यास स्वतंत्र आहोत. भारत हा आमचा ब्रेक्झिटनंतरचा सर्वात महत्वाचा भागीदार देश आहे. आमच्या धोरणात भारताला विशेष स्थान आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार हा केवळ ब्रिटनसाठीच नव्हे, तर भारतासाठीही त्याने आजवर केलेल्या कोणत्याही करारापेक्षा मोठा व्यवहार आहे, ही बाबही त्यांनी भाषणात स्पष्ट केली आहे.

जुलै 2025 मध्ये करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2025 मध्ये ब्रिटनचा दौरा केला होता. त्यावेळी भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यात आला होता. या कराराच्या अंतर्गत ब्रिटनने भारतातून आयात होणाऱ्या बहुतेक वस्तूंवरील आयात शुल्क रद्द केले होते. तर भारतानेही ब्रिटनकडून भारतात येणाऱ्या अनेक वस्तूंवरील करांमध्ये मोठी कपात केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारात वेगाने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा व्यापार काही वर्षांमध्ये 30 अब्ज पौंडांपर्यंत (जवळपास 3 लाख 20 हजार कोटी रुपये) नेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यामुळे भारताही वस्त्रप्रावरणे, हिरे, चर्मोद्योग, पादत्राणे, क्रीडा साहित्य, अभियांत्रिकी वस्तू, संरक्षण सामग्री आदी क्षेत्रांमध्ये लक्षावधी नवे रोजगार निर्माण होण्याची स्थिती आहे. 2030 पर्यंत भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार आत्ता आहे, त्याच्या दुप्पट करण्याचे ध्येय दोन्ही देशांनी बाळगले असून ते साध्य होईल, असा दोन्ही देशांचा विश्वास आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

स्टार्मर यांचे भव्य स्वागत

बुधवारी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कीर स्टार्मर यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांची व्यवस्था मुंबईतील ताजमहाल हॉटेलात करण्यात आली असून तेथेच उद्योगपतींच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्मर यांची प्रशंसा करताना दोन्ही देशांमधील संबंध नजीकच्या भविष्यकाळात अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला.

यश राज स्टुडीओला भेट

मुंबईत कीर स्टार्मर यांनी यश राज स्टुडीओला भेट दिली. प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांचीही त्यांनी या स्टुडीओत भेट घेतली. अंधेरीतील हा स्टुडीओ चित्रपटांचे चित्रिकरण करण्याचे एक महत्वाचे स्थान आहे. या स्टुडीओत स्टार्मर यांनी राणी मुखर्जी आणि या स्टुडीओचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय विधानी यांच्यासमवेत एक स्क्रीनिंगही पाहिले. सांस्कृतिकदृष्ट्या ही भेट महत्वाची आहे.

उद्योगपतींसमोर भाषण

ड कीर स्टार्मर यांचे मुंबईत उद्योगपतींच्या परिषदेत द्विपक्षीय संबंधांवर भाषण

ड भारत हा ब्रिटनचा सर्वाधिक महत्वाचा व्यापारी भागीदार, दृढ संबंधांवर भर

ड भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार पाच वर्षांमध्ये दुप्पट करण्याचे ध्येय

Comments are closed.