भारत-यूके नौदल व्यायाम सुरू होते

दोन्ही देशांच्या महत्वाच्या युद्धनौकांचा सहभाग

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांच्या संयुक्त सरावाला रविवारी हिंदी महासागराच्या पश्चिम भागात प्रारंभ करण्यात आला आहे. हा संयुक्त सराव ‘कोंकण’ या नावाने संबोधला जात आहे. हा युद्धसराव असून त्यात दोन्ही देशांच्या विमानवाहू नौका, युदनौका आणि विनाशिका आणि पाणबुड्या भाग घेत आहेत.

या युद्ध सरावात भारताचे नेतृत्व आएएनएस विक्रांत या विमानवाहू नौकेकडे आहे. ही नौका आपल्या मिग 29 या अत्याधुनिक युद्धविमानांसह भाग घेत आहे. तर ब्रिटनचे नेतृत्व एचएमएस पिन्स ऑफ वेल्स या विमानवाहू नौकेकडे आहे. या नौकेवर एफ 35 ए ही बहुउद्देशीय युद्धविमाने आहेत. या सरावात नॉर्वे आणि जपान यांच्याही काही नौका सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.

मुक्त भारत

भारत-प्रशांतीय सागरी क्षेत्र व्यापार आणि वाहतूक यांच्यासाठी मुक्त असले पाहिजे. या क्षेत्रावर कोणत्याही देशाचे एकहाती वर्चस्व असता कामा नये, हे भारत आणि ब्रिटन यांचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरुन, या क्षेत्राची व्यापारी आणि वाहतूक मुक्तता सुरक्षित रहावी, यासाठी हा संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. हा चीनला अप्रत्यक्ष इशारा आहे. सध्या चीन आपले बळ भारत-प्रशांतीय क्षेत्रात वाढवित आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्वॉड ही संघटना भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी जन्माला घातली आहे. आता भारत, बिटन, जपान आणि नॉर्वे हे देशही या उद्देशासाठी एकत्र येताना दिसत आहेत. या सागरी भागात नियमबद्ध आंतरराष्ट्रीय व्यवस्था रहावी, हे मुख्य उद्दिष्ट आहे, अशी माहिती या सरावात भाग घेणाऱ्या ब्रिटीश नौदलाच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

स्टार्मर दौऱ्याची पार्श्वभूमी

ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर हे 8 आणि 9 ऑक्टोबरला भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी स्टार्मर यांची द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देश संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्य दृढ करण्याच्या योजनेवर काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर हा संयुक्त नौदल युद्धसराव केला जात आहे. त्यामुळे त्याच्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. भारताने गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या नौदलाच्या सामर्थ्यात वाढ केली आहे. या वाढीचे आणि भारताच्या सागरी सामर्थ्याचे प्रत्यंतर या सरावात येईल, असे दिसून येते.

 

Comments are closed.