भारत-अमेरिका करार एप्रिलपासून लागू होणार आहे
पियुष गोयल यांचे वक्तव्य, अन्य करारांचाही प्रारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतरिम व्यापारी करार येत्या एप्रिलपासून कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. या कराराला अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रिया 23 फेब्रुवारीपासून हाती घेतली जाणार आहे. यासाठी भारताच्या अधिकाऱ्यांचे मंडळ अमेरिकेत जाणार आहे. या कराराप्रमाणेच ब्रिटन आणि ओमान यांच्याशी झालेले मुक्त व्यापार करारही एप्रिलपासूनच लागू होतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे.
भारताने न्यूझीलंड या देशाशीही असाच मुक्त व्यापार करार केला आहे. या कराराला न्यूझीलंडच्या संसदेने मान्यता दिल्यानंतर तो येत्या सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारताने ब्रिटन, न्यूझीलंड, युरोपियन महासंघ, ओमान, संयुक्त अरब अमिरात आदींशी मुक्त व्यापार करार केले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचीही घोषणा 2 फेब्रुवारीला करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यांमध्ये हे सर्व करार लागू होतील आणि भारताच्या व्यापारात चहुमुखी वाढ होईल, अशी शक्यता आहे.
भारताचे मंडळ अमेरिकेत जाणार
भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या अंतरिम व्यापार कराराला अंतिम स्वरुप देण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून, म्हणजे 23 एप्रिलपासून हाती घेण्यात येणार आहे. भारताच्या वाणिज्य अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ या कामाकरीता अमेरिकेला जाणार आहे. हे शिष्टमंडळ 22 फेब्रुवारीला अमेरिकेत पोहचण्याची शक्यता आहे. हे शिष्टमंडळ अमेरिकेच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करून या कराराचे प्रारुप सज्ज करणार असून नंतर त्यावर दोन्ही देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होणार आहेत. भारतासाठी हा करार अत्यंत लाभदायक असल्याचे स्पष्ट होत आहे.
प्रारुपाचे रुपांतर कायदेशीर करारात
या महिन्याच्या प्रारंभी भारत आणि अमेरिका कराराची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली होती. नंतर या कराराच्या प्रारुपात अमेरिकेकडूनच भारताला अनुकूल ठरतील असे परिवर्तन करण्यात आले. आता या प्रारुपाला कायदेशीर कराराचे स्वरुप दिले जाणार आहे. त्यासाठी प्रथम या कराराचे अंतिम प्रारुप सज्ज केले जाणार आहे. नंतर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर कायदेशीर करार अस्तित्वात येईल.
दर्पण जैन करणार नेतृत्व
अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांचे नेतृत्व भारताच्या व्यापार विभागाचे सहसचिव दर्पण जैन हे करणार आहेत. ते अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. कराराला अंतिम स्वरुप देताना त्याची भाषा कशी असावी, यावर प्रामुख्याने विचार केला जाणार आहे. करार दोन्ही देशांसाठी लाभदायक असावा, अशाप्रकारे त्याचे अंतिम स्वरुप निर्धारित करण्यात येणार असून ही प्रक्रिया एका आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर योग्यवेळी स्वाक्षऱ्या होतील.
कृषी क्षेत्राची सुरक्षा सुनिश्चित
भारत आणि अमेरिका यांच्यातील करारात भारताच्या कृषी क्षेत्राची पूर्ण सुरक्षा सुनिश्चित केली जात आहे. भारताचे कृषी क्षेत्र अमेरिकेच्या कृषी उत्पादनांसाठी मोकळे केले जाणार नाही. जी उत्पादने भारतात निर्माणच होत नाहीत, ती वगळता अमेरिकेची कोणतीही कृषी उत्पादने भारतात आयात केली जाणार नाहीत, असे दिसून येत आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी जे परिवर्तन या करारात केले आहे, त्यातून हे संरक्षण सुनिश्चित झाले आहे. हे परिवर्तन अमेरिकेने स्वत:हून केले असून भारताची भूमिका त्या देशाने समजून घेतली आहे, असे दिसून येत आहे. गेले दहा महिने या करारासंदर्भात दोन्ही देशांची चर्चा होत आहे. काहीवेळा ही चर्चा अडकलीही होती. दोन्ही देशांमध्ये व्यापारी तणावही निर्माण झाला होता. तथापि, तो दूर करण्यात दोन्ही देशांना यश आल्याने करार सुकर होत आहे.
सर्व करार काही काळात कार्यन्वित
ड भारत-अमेरिका कराराला अंतिम स्वरुप देण्यासाठी चर्चेला प्रारंभ होणार
ड ब्रिटन, ओमान, न्यूझीलंड आदी देशांशी झालेले करारही लागू केले जाणार
ड भारत-अमेरिका चर्चेसाठी भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेत जाण्यास सज्ज
ड सर्व करार लागू झाल्यानंतर भारताच्या व्यापारात मोठी वृद्धी हेणे शक्य
Comments are closed.