भारत-अमेरिका व्यापार करार पूर्णत्वाच्या जवळ आहे
कायदेशीर-तांत्रिक भाषे’वर काम सुरू : सर्जिओ गोर यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-अमेरिका व्यापार करार जवळपास पूर्ण झाला असल्याचे अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी रविवारी सांगितले. आता केवळ कायदेशीर आणि तांत्रिक भाषेला अंतिम स्वरूप दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही अंतिम करारामध्ये तांत्रिक भाषा आणि कायदेशीर स्वरुप या दोन्ही गोष्टींना फार महत्त्वाचे स्थान असल्याचेही ते पुढे म्हणाले.
व्यापारातील ‘तांत्रिक भाषे’वर दोन्ही देशांचे अधिकारी काम करत आहेत. एखाद्या कराराला तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतरही अनेक गोष्टी ठरवाव्या लागतात. काही विशिष्ट वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले जाईल, परंतु अंतिम करारामध्ये हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असल्याने कोणत्या वस्तूंवर, कोणत्या प्रमाणात, कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या अटींनुसार कमी-अधिक शुल्क लागू होईल याचा सारासार विचार करून कराराला अंतिम स्वरुप दिले जात असल्याचे गोर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, कोणत्याही नियमाबाबत वाद निर्माण झाल्यास, त्याचा अर्थ काय असेल आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई केली जाईल, हे सर्व करारामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले असते.
कायदेशीर भाषा का महत्त्वाची?
व्यापार करारामध्ये प्रत्येक शब्दाला महत्त्व असते. वाटाघाटींदरम्यान, दोन देश एखाद्या मुद्यावर सहमत होऊ शकतात, परंतु जर अंतिम दस्तऐवजातील भाषा अस्पष्ट राहिली, तर ते नंतर त्याचा वेगळा अर्थ लावू शकतात. त्यामुळे, कायदेशीर संघ करारामध्ये वापरलेल्या शब्दांचा अर्थ अचूकपणे नोंदवत असतात. तसेच जर भारत किंवा अमेरिकेने एखाद्या अटीचे पालन केले नाही, तर दुसरी बाजू कोणती पावले उचलू शकते, याची रुपरेषाही त्यात नमूद केलेली असते.
Comments are closed.