Iran Israel War – तुम्ही रशियाकडून 30 दिवस तेल खरेदी करू शकतात; अमेरिकेकडून हिंदुस्थानला सवलत
Iran Israel Us War च्या पार्श्वभूमीवर जगभरात कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून टाकण्यात आलेल्या बंधनांमुळे हिंदुस्थानला देखील कच्च्या तेलाच्या पुरवठ्याची झळ पोहोण्याची शक्यता होती. अखेर अमेरिकेकडून शुक्रवारी हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदीची परवानगी देत असल्याचे जाहीर करण्यात आले असल्याने केंद्रातील मोदी सरकारला दिलासा मिळणार आहे.
३० दिवसांची सवलत (Waiver)
अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी शुक्रवारी जाहीर केले की, हिंदुस्थानी तेल शुद्धीकरण कंपन्यांना रशियन तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत देण्यात आली आहे. ‘ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल’ने ५ मार्च २०२६ पर्यंत जहाजांवर लादलेले रशियन कच्चे तेल हिंदुस्थानला विकण्यास अधिकृत परवानगी दिली आहे.
४ एप्रिलपर्यंत मुदत
ही सवलत ३ एप्रिल २०२६ च्या रात्रीपर्यंत वैध असेल. यामध्ये विविध निर्बंधांमुळे अडकलेल्या जहाजांमधील व्यवहारांचाही समावेश आहे. मध्यपूर्वेतील वाढता तणाव पाहता जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
हिंदुस्थानचे महत्त्व
सचिव बेसेन्ट यांनी हिंदुस्थानचा उल्लेख अमेरिकेचा ‘अत्यावश्यक भागीदार’ (Essential Partner) असा केला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा ऊर्जा अजेंडा तेल आणि वायू उत्पादन विक्रमी पातळीवर नेणारा आहे, असे सांगत त्यांनी ही सवलत केवळ समुद्रात अडकलेल्या तेलासाठी असल्याने रशियाला याचा मोठा आर्थिक फायदा होणार नाही, असा दावा केला आहे.
रशियावरील निर्बंधांची पार्श्वभूमी
युक्रेनवरील आक्रमणानंतर अमेरिकेने रशियाच्या ‘लुकोइल’ आणि ‘रोसनेफ्ट’ सारख्या कंपन्यांवर निर्बंध लादले होते. यामुळे जानेवारीत हिंदुस्थानची रशियन तेल आयात १.१ दशलक्ष बॅरल प्रति दिवस (जे नोव्हेंबर २०२२ नंतरचे निच्चांकी होते) इतकी खाली आली होती. मात्र, फेब्रुवारीत हा वाटा पुन्हा ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
तेलाच्या विहिरींवर हल्ले
आखाती देशांमधील सौदी अरामकोची ‘रास तनुरा’ रिफायनरी आणि इराकचे ‘रुमैला’ तेल क्षेत्र यांसारख्या मोठ्या प्रकल्पांवर गेल्या काही दिवसांत हल्ले झाले आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे जागतिक पुरवठ्याचा २०% हिस्सा धोक्यात आला असून ‘ब्रेंट क्रूड’चा भाव ८३.०७ डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचला आहे.
Comments are closed.