ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रायली शस्त्रांचा वापर झाला होता, बेंजामिन नेतन्याहू यांचा खुलासा

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतः पुष्टी केली की, हिंदुस्थानने या ऑपरेशनमध्ये इस्रायली शस्त्रे वापरली होती. यापैकी प्रमुख म्हणजे बराक-8 क्षेपणास्त्र प्रणाली आणि हार्पी ड्रोन. नेतन्याहू म्हणाले की, आमची शस्त्रे जमिनीवर वापरली गेली आहेत आणि त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांचे हे विधान हिंदुस्थान आणि इस्रायल यांची संरक्षण भागीदारीची जाणीव करुन देते. हे सहकार्य केवळ तांत्रिक पुरवठ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यात संयुक्त विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचाही समावेश आहे. डीआरडीओ आणि इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने संयुक्तपणे बराक-8 विकसित केले आहे. हे हिंदुस्थानच्या संरक्षण स्वायत्ततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
बराक-8 हे एक लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र (LR-SAM) आहे. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि UAV सारख्या हवाई धोक्यांना रोखण्यासाठी डिझाइन केलेले आहे. चारही दिशांकडून येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. तसेच एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता यामध्ये आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये बराक-8 चा वापर पाकिस्तानी क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी करण्यात आला होता. त्याने केवळ क्षेपणास्त्रांना रोखले नाही तर हिंदुस्थानी हवाई क्षेत्राची सुरक्षितता देखील सुनिश्चित केली होती.
हार्पी हे शत्रूच्या रडार प्रणालीला नष्ट करण्यासाठी विकसित केले गेले आहे. त्याची खासियत अशी आहे की ते SEAD (शत्रू हवाई संरक्षणाचे दमन) मोहिमेसाठी पूर्णपणे योग्य आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये, हार्पी ड्रोनने शत्रूच्या रडार प्रणालीला निष्क्रिय करून, हिंदुस्थानी हवाई दल आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी मार्ग मोकळा केला होता.
हिंदुस्थानच्या प्रमुख शस्त्रास्त्र पुरवठादारांमध्ये इस्रायल चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या दशकात हिंदुस्थानने इस्रायलकडून सुमारे $2.9 अब्ज किमतीची संरक्षण उपकरणे आयात केली आहेत. यामध्ये रडार, युएव्ही, क्षेपणास्त्र प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध उपकरणे यांचा समावेश आहे.
Comments are closed.