सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली! कर्णधार हरमनप्रीत कौरने घेतला मोठा निर्णय

ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला, दुसरी उपांत्य फेरी थेट क्रिकेट स्कोअर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज महिला वर्ल्ड कप 2025 मधील दुसरा उपांत्य सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अनेक वर्षांपासून उपांत्य फेरीत पराभूत झालेला नाही. त्यामुळे टीम इंडियासाठी अंतिम फेरी गाठणे ही एक मोठी कसोटी ठरणार आहे. मात्र, 2017 मध्ये भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला होता. या सामन्यात विजयी ठरणारी टीम अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर मात करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान मिळवले आहे, तर भारत कसाबसा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारू शकला आहे. मात्र, मुंबईत पावसाचे सावट दिसत आहे.

विजयपथवार ऑस्ट्रेलिया (भारत वि ऑस महिला सेमीफायनल थेट स्कोअर)

ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आजपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. गट फेरीतील सर्व सामने जिंकत त्यांनी अपराजित अशी कामगिरी केली आहे. महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात त्यांचा विजय रथ तब्बल 15 सामन्यांपासून अखंड सुरू आहे. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर सर्वात आधी हा विजय रथ अडवावा लागणार आहे.

आठ वर्षांपूर्वी भारताने केला होता चमत्कार

2017 नंतर ऑस्ट्रेलियाने कोणत्याही आयसीसी स्पर्धेतील नॉकआउट सामना गमावलेला नाही. पण अगदी आठ वर्षांपूर्वी त्यांनी गमावलेला शेवटचा नॉकआउट सामना भारताविरुद्धच होता. 2017 च्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्या सामन्यात सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने खेळलेली 171 धावांची ऐतिहासिक खेळी आजही अविस्मरणीय आहे.

भारताच्या बाजूने घरचा पाठिंबा

ऑस्ट्रेलियाकडे आकडेवारी आणि दमदार रेकॉर्डचा आधार असला, तरी भारताकडे आहे अपार जिद्द, घरच्या मैदानाचा आत्मविश्वास आणि प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा.

वर्ल्ड कपमधील विक्रम कसा आहे?

महिला एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया 14 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने तीन वेळा विजय मिळवला आहे तर ऑस्ट्रेलियाने 11 वेळा विजय मिळवला आहे.

भारत-ऑस्ट्रेलियाचा एकूण विक्रम

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 60 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने 11 जिंकले आहेत आणि 49 मध्ये पराभव पत्करला आहे. भारतीय भूमीवर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या बाबतीत, ऑस्ट्रेलियाने तेथे खेळल्या गेलेल्या 28 एकदिवसीय सामन्यांपैकी 23 सामने जिंकले आहेत.

Comments are closed.