भारत-इंग्लंड तिसऱ्या टी20 सामन्याची वेळ बदलली! 'या' वेळी सुरू होणार सामना
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका एका रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि दुसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडने भारतीय संघाचा पराभव करून विजय मिळवला. सध्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ मालिकेत ०-१ अशा फरकाने पिछाडीवर आहे. यादरम्यान आता तिसऱ्या टी-२० सामन्याची वेळ बदलली आहे.
सध्याचा मालिकेचा निकाल पाहता भारताला जिंकायची असेल तर त्यांना तिसरा टी-२० सामना जिंकावाच लागणार आहे. मात्र, मागील सामन्याप्रमाणे हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार नाही. या सामन्यात भारताची कामगिरी कशी असेल हे पाहण्यासाठी चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागं राहावं लागणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना ७ जुलै रोजी नॉटिंगहॅममधील ऐतिहासिक ‘ट्रेंट ब्रिज’ मैदानावर खेळवला जाईल. मालिकेतील दुसरा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू झाला होता, मात्र तिसऱ्या सामन्याची वेळ पूर्णपणे वेगळी आहे; ट्रेंट ब्रिजवरील या सामन्यासाठी नाणेफेक रात्री ९:३० वाजता होईल आणि सामन्याला सुरूवात रात्री १०:०० वाजता होणार आहे.
दोन्ही संघांच्या एकूण कामगिरीचा विचार करता, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं पारडं थोडं जड असल्याचं दिसून येतं. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत ३२ सामने खेळवले गेले आहेत. यापैकी १८ सामने भारताने जिंकले आहेत. तर इंग्लंडने १३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर यापैकी एक सामना अनिर्णित राहिला. मात्र, इंग्लंडच्या भूमीवर खेळतानाचा रेकॉर्ड पाहिल्यास आकडेवारी बदलते. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये इंग्लंडमध्ये ११ सामने खेळले गेले आहेत; त्यापैकी यजमान संघाने सहा सामने जिंकले आहेत, तर भारताने चार विजय मिळवले आहेत आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.
नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज मैदानावर भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. येथे खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी भारताने दोन सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. विशेष म्हणजे, या मैदानावर इंग्लंडविरुद्ध भारताने एक सामना २०२२ मध्ये खेळला आहे; यात २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा १७ धावांनी पराभव झाला. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अवघ्या ५५ चेंडूंत ११७ धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली होती, परंतु त्याला संघाला विजयापर्यंत नेण्यात यश आलं नाही.
Comments are closed.