कुलदीप, अर्शदीपची इंग्लंड पिकनिक, पाचही कसोटीत पॅव्हेलियनमध्येच

पाच कसोटी सामन्यांची मालिका असूनही फिरकीवीर कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि आघाडीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन या तिघांसाठी इंग्लंडचा 50 दिवसांचा दौरा अक्षरशः पिकनिक ठरली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या संघनिवडीत हे तिघेही फिट न बसल्यामुळे या तिघांना एकही कसोटी खेळण्याची संधी मिळू शकली नाही.

आजपासून सुरू झालेल्या शेवटच्या कसोटीत तरी हिंदुस्थानी संघात कुलदीप यादवला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती, पण शुभमन गिलने नाणेफेकीपूर्वी जाहीर केलेला संघ पाहून कुलदीप यादवला पुन्हा एकदा धक्का बसला. गेल्या कसोटीतही कुलदीपला अंतिम संघात खेळविण्याची चर्चा होती. तसेच आजही तो संघात फिट बसेल, असे अंदाज वर्तवले जात होते. पण तीन-तीन फिरकीवीरांना खेळवणे शक्य नसल्यामुळे संघ व्यवस्थापनाच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये कुलदीप पुन्हा एकदा अनफिट ठरला. आपल्या फिरकीने प्रतिस्पर्धी संघांना बेजार करणारा कुलदीप या दौऱयात वारंवार डावलण्यात आल्यामुळे हताश आणि निराश झाला आहे. कुलदीप आपली शेवटची कसोटी गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरूत खेळला होता.

अरशदीप, अभिमन्यूचे पदार्पणही हुकले

बुमराच्या अनुपस्थितीत अर्शदीपला संधी मिळणार असे बोलले जात होते. पण डावखुरा प्रभावी गोलंदाज अर्शदीप सिंहला इंग्लंड दौऱयासाठी कसोटी संघात निवडण्यात आले, पण ‘गंभीरकृपे’मुळे हा फिट असलेला गोलंदाजही संघाच्या हिट संघनिवडीत शेवटपर्यंत फिट बसूच शकला नाही. त्याला आपले कसोटी पदार्पण करण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. तसेच काहीसे अभिमन्यू ईश्वरनबाबतही घडले.

Comments are closed.