टीम इंडियानं कसोटी मालिका बरोबरीत सोडवली, इंग्लंड क्रिकेट बोर्ड पुन्हा सज्ज, नवी मालिका जाहीर

नवी दिल्ली : शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील भारतीय संघानं पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत सोडवली. ओव्हल कसोटीत इंग्लंडला 6 धावांनी पराभूत करत शुभमन गिलच्या टीम इंडियानं मालिकेत बरोबरी साधली. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी बरोबरीत सुटल्यानंतर आता भारत आणि इंग्लंड पुन्हा आमने सामने येणार  आहेत. भारत आणि इंग्लंड आता कसोटी खेळणार नाहीत तर टी 20 मालिका आणि एकदिवसीय सामन्यांच्या निमित्तानं आमने सामने येतील.  टीम इंडिया जुलै 2026 ला इंग्लंडचा दौरा करणार आहेत. दोन्ही देशांमध्ये पाच सामन्यांची टी 20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडेल. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा- विराट कोहली मैदानात पाहायला मिळतील.

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं या मालिकेचं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर केलं होतं. ही मालिका 1 जुलै ते 11 जुलै दरम्यान होणार आहे. ईसीबीनं या मालिकेतील सामने कुठे होणार आहेत हे सांगितलं आहे. डरहम,मँचेस्टर, नॉटिंघम, ब्रिस्टॉल आणि साउथॅम्प्टन  या ठिकाणी सामने होणार आहेत. पाच टी 20 सामने  1 जुलै, 4 जुलै, 7 जुलै, 9 जुलै, 11 जुलै या दिवशी सामने होतील. तर, तीन एकदिवसीय सामने  14 जुलै,16 जुलै आणि 19 जुलै या दिवशी होणार आहेत.

2026 च्या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडच्या संघाची चांगली तयारी व्हावी म्हणून ईसीबीनं भारताविरुद्ध मालिका खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 चा टी-20 वर्ल्ड कप भारतात होणार आहे. तर, भारतासाठी इंग्लंडचा दौरा देखील महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात अनुभवी खेळाडू आणि नव्या प्रयोगाची संधी भारताला असेल.

टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतानं जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर टी 20 संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं होतं. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत देखील सूर्यकुमार यादव नेतृत्व करु शकतो. हार्दिक पांड्या या संघात असू शकतो.याशिवाय संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे सलामीवीर देखील संघात असतील. रिंकु सिंग मॅच फिनिशर म्हणून संघात असू शकतो. अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल किंवा रवि बिश्नोई देखील संघात असू शकतो. आयपीएलमधून नवं टॅलेंट बीसीसीआयला मिळतं.आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यास भारतीय टी 20 संघाची दारं त्या खेळाडूंसाठी उघडली जाऊ शकतात.

दरम्यान,  भारतीय महिला क्रिकेट संघ देखील पुढील वर्षी  मे- जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर असेल. महिला संघ 28 मे ते 2 जून दरम्यान तीन टी 20 क्रिकेट सामने खेळेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.