उपांत्य फेरीत महासंग्राम! भारत-इंग्लंड भिडणार; कधी, कुठे आणि किती वाजता होणार सामना

७ फेब्रुवारीपासून आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ला सुरुवात झाली आहे, स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत २० संघ सहभागी झाले, जिथे सर्व संघांना प्रत्येकी ५ संघांच्या चार गटात विभागण्यात आले. गट टप्प्यात प्रत्येक संघाने त्यांच्या गटातील इतर चार संघांविरुद्ध एक सामना खेळला. या टप्प्यानंतर, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ फेरीत दाखल झाले, तर उर्वरित १२ संघ बाहेर पडले.

सुपर ८ फेरीतही चुरशीचे सामने झाले. १ मार्च रोजी भारताने वेस्ट इंडिजचा ‘करो या मरो’ सामन्यात पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयासह उपांत्य फेरीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले. भारतासोबतच न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडनेही अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. उल्लेखनीय म्हणजे, न्यूझीलंडचा अपवाद वगळता उर्वरित तीन संघ सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

दुसऱ्या उपांत्य फेरीत यजमान आणि गतविजेता भारत इंग्लंडशी भिडणार आहे. हा सामना ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मैदानावर भारताने ग्रुप स्टेजमध्ये अमेरिकेला हरवले होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा टीम इंडियाला होण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येत आहेत. २०२२ मध्ये इंग्लंडने भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला होता, तर २०२४ मध्ये भारताने त्या पराभवाचा बदला घेतला. त्यामुळे दोन्ही संघ सध्या १-१ अशा बरोबरीत आहेत. यावेळी कोणता संघ आघाडी घेऊन अंतिम फेरीत प्रवेश करेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, पहिल्या उपांत्य फेरीत ४ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांसमोर येतील. या दोन सामन्यांनंतर अंतिम फेरीत पोहोचणारे दोन्ही संघ निश्चित होतील. आता क्रिकेट चाहते रोमांचक उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी उत्सुक आहेत.

Comments are closed.