हॅटट्रिकसाठी सज्ज, आज तिसरा एकदिवसीय सामना

पहिल्या दोन्ही सामन्यांत इंग्लंडचा पराभव करून हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्वपरीक्षा आधीच जिंकली आहे. आता मालिकेची औपचारिकता पूर्ण करणारा तिसरा सामना बुधवारी खेळला जाणार असून यात विजय नोंदवत हॅटट्रिक आणि निर्भेळ यश संपादण्याचे ध्येय हिंदुस्थानी संघाने समोर ठेवले आहे. दुसरीकडे मालिकेचा शेवट गोड करण्याचे पाहुण्या इंग्लंडचे संघाचे एकमेव ध्येय आहे.

कटक येथे झालेल्या दुसऱया सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या निराशाजनक कामगिरीला तिलांजली देताना आपले 32 वे शतक साजरे केले. रोहितला हरवलेला सूर पुन्हा गवसला असला तरी विराट कोहलीच्या शतकाचीही अवघा हिंदुस्थान वाट पाहतोय. अहमदाबादच्या स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने तोसुद्धा आपल्या शतकी खेळीला गवसणी घालेल, अशी तमाम क्रिकेटप्रेमींचा विश्वास आहे. तसेच या सामन्यात ऋषभ पंत पुन्हा एकदा स्टम्पमागे यष्टिरक्षक करताना दिसेल. हिंदुस्थान विजयी ठरला असल्यामुळे या सामन्यात काही बदल केले जाणार हे निश्चित आहे, पण तो बदल संघाची लय बदलणारा नसावा, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Comments are closed.