नामीबियाचा धुव्वा उडवला, आता निशाण्यावर पाकिस्तान; विजयानंतर सूर्याने थेट शड्डूच ठोकला; म्हणाला
India vs Namibia T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये टीम इंडियाने नामीबियावर तब्बल 93 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने आपली लय आणि आत्मविश्वास दोन्ही गवसल्याचे स्पष्ट झाले आहे. सलामीवीर ईशान किशनने अवघ्या 24 चेंडूत 61 धावांची तडाखेबाज खेळी करत डावाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानंतर हार्दिक पांड्याने 52 धावांची धडाकेबाज खेळी साकारत संघाला 209 धावांच्या मजबूत टप्प्यावर नेले. प्रत्युत्तर नामीबियाचा डाव केवळ 116 धावांत आटोपला आणि भारताने मोठा विजय आपल्या नावे केला.
कर्णधार सूर्यकुमार यादव काय म्हणाला?
सामना जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत म्हणाला की, “सुरुवातीला आम्ही थोडे सावध होतो, पण आता संघ योग्य लयीत आला आहे. पुढील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
#TeamIndia ICC पुरुष #T20WorldCup 💪
The #MenInBlue ने नामिबियाला ९️⃣3️⃣ धावांनी हरवून सलग २️⃣ विजय मिळवले!
स्कोअरकार्ड ▶️ https://t.co/SQLoaZjq98#INDvNAM pic.twitter.com/b0PL2LLSbI
— BCCI (@BCCI) फेब्रुवारी १२, २०२६
पुढे तो म्हणाला की, खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी नव्हती. मात्र ईशान किशन आणि संजू सॅमसन यांनी दिलेल्या सुरुवातीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला. मधल्या फळीत काही गडी लवकर बाद झाले, तरी शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांच्या भागीदारीने संघाला भक्कम धावसंख्या गाठता आली.
सूर्याने नामीबियाच्या गोलंदाजांचेही कौतुक केले. “चेंडू थोडा थांबून येत होता, तरी त्यांनी अचूक नियोजनासह चांगली गोलंदाजी केली,” असे ते म्हणाले.
दीर्घ विश्रांतीनंतर संघात परतलेल्या जसप्रीत बुमराहने 4 षटकांत 20 धावा देत 1 विकेट घेतला. सूर्यकुमार यादवने त्याच्या पुनरागमनाला सकारात्मक संकेत मानत सांगितले की, पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या आव्हानासाठी बुमराह पूर्णपणे सज्ज आहे.
सामनावीर हार्दिक पांड्याचे विशेष कौतुक करताना कर्णधार म्हणाला की, “हार्दिक नवीन चेंडू, जुना चेंडू आणि डेथ ओव्हर्स प्रत्येक परिस्थितीत प्रभावी गोलंदाजी करतो. त्याची आक्रमक फलंदाजी संघासाठी मोठी ताकद आहे. महत्त्वाच्या सामन्यात त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ मिळणे संघासाठी फायदेशीर आहे.”
एकूणच, या भव्य विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्ण तयारीत असल्याचे सूर्यकुमार यादव यांनी स्पष्ट केले आहे. आता चाहत्यांची नजर 15 फेब्रुवारीला होणाऱ्या हायव्होल्टेज लढतीकडे लागली आहे.
हे ही वाचा –
Comments are closed.