IND vs NZ: रायपूरमधील दुसरा टी20 कधी सुरू होणार? वेळेत बदल झाला का?
शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध खेळलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताला 1-2 ने गमवावी लागली होती. मात्र त्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन करत न्यूझीलंडला पहिल्याच सामन्यात मोठा धक्का दिला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने नागपूरमध्ये किवी संघाचा 48 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या विजयासह भारताने 2016 मध्ये नागपूरमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाची परतफेडही केली. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी मिळून प्रभावी कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व गाजवलं होतं. त्यामुळे आता रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताची विजयी लय कायम राहते का, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय सामना शुक्रवारी 23 जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार असून, दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार असून, संध्याकाळी 6.30 वाजता नाणेफेक पार पडणार आहे. क्रिकेट चाहत्यांना हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्सवर थेट पाहता येणार आहे. तसेच मोबाईल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहू इच्छिणाऱ्यांसाठी जिओहॉटस्टार अॅपवर लाईव्ह स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या टी20 सामन्यात भारताच्या विकेटकीपर फलंदाजांवर विशेष लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करता न आलेले इशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यासमोर रायपूरमध्ये पुनरागमन करत मोठी खेळी करण्याचं आव्हान असेल. नागपूरमध्ये संजू सॅमसन 10 धावांवर, तर इशान किशन 8 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे रायपूरमध्ये हे दोघे आपली छाप पाडतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Comments are closed.