हिंदुस्थानी क्रिकेटपटूंचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार, एजबॅस्टनवर खेळला जाणारा साखळी सामना रद्द

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या जखमा आजही भळभळून वाहताहेत. अशा स्थितीत पाकिस्तानशी खेळणे म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाण नागरिकांचा अपमान असल्याची भावना जागृत होताच हिंदुस्थानच्या दिग्गज खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स (डब्ल्यूसीएल) अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध होणाऱया सामन्यावर बहिष्कार घालण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरचा संघर्ष पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावरही पेटला.

सध्या इंग्लंडमध्ये सहा देशांतील ज्येष्ठ खेळाडूंमध्ये क्रिकेटची अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना एजबॅस्टनवर हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रंगणार होता. या सामन्याला चांगली प्र्रसिद्धीही लाभली होती. या स्पर्धेत दोन सामनेही खेळले गेले. मात्र रविवारी होणाऱया हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील सामन्याने सोशल मीडियावर अक्षरशः रान पेटवले. हिंदुस्थानच्या असंख्य क्रिकेट चाहत्यांनी या सामन्याबद्दल जहरी टीका करताना पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. पहलगाम हल्ल्यात केलेल्या प्रकारानंतर पाकिस्तानविरुद्ध कसलेही संबंध ठेवण्याची गरज नसल्याच्या भावना व्यक्त केल्यानंतर क्रिकेटपटूंनीही जोरदार प्रतिक्रिया व्यक्त करत या पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास विरोध दर्शवला आणि सामनाच रद्द केला.

आयोजक आणि पुरस्कर्त्यांचाही पाठिंबा

हिंदुस्थानच्या ज्येष्ठ खेळाडूंच्या बहिष्कारानंतर स्पर्धेच्या आयोजकांनी हिंदुस्थानींना पाठिंबा दर्शवत सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यामुळे ‘खेळाडू आणि चाहत्यांच्या भावना अप्रत्यक्षरीत्या दुखावल्या गेल्या आहेत.’ त्यामुळे आम्ही सामना न खेळवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. मग स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते इझीमायट्रिप यांनीही मुस्लिमविरोधी राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्धचा हिंदुस्थानचा कोणताही सामना पुरस्कृत न करण्याचा इशारा दिल्यामुळे पाकिस्तानच्या संघाची मोठी नाच्चकी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला याचा खूप मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या स्पर्धेत सहा संघ खेळत असून पाकिस्तानने सलामीचा सामना जिंकत खणखणीत सुरुवात केली. शनिवारी वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही सामना खेळला गेला. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांना होणारा विरोध पाहता हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांनी बाद फेरीत प्रवेश केला तर त्या सामन्यालाही अशाच पद्धतीचा विरोध होऊ शकतो. परिणामतŠ या मालिकेचे भवितव्यच अधांतरी लटकलेले आहे.

आशिया चषक, चहा-20 वर्ल्ड कपचे सामनेही लटकणार

आगामी काळात हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक, टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळले जाणार आहेत. मात्र आज झालेल्या बहिष्कारानंतर ही आग वणव्यात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील सामनेही रद्द करण्याची वेळ आयोजक आणि प्रायोजकांवर आल्यास त्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उभय देशांमधील लढतीत राजकीय हस्तक्षेपासह लोकांचाही विरोध वाढत चालला आहे. परिणामतः उभय देशांतील क्रिकेट पुन्हा एकदा थांबण्याची भीती निर्माण झाली आहे.

देशापेक्षा मोठं काहीही नाही

एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिक दुखावला आहे. माझ्यासाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही. त्यामुळे स्पर्धा कोणतीही असो, पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे जाहीर केले. मग त्याच्यापाठोपाठ हरभजन सिंह, सुरेश रैना, इरफान पठाण, युसूफ पठाण यांनीही सामन्यातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. या स्पर्धेत हिंदुस्थानसह इंग्लंड, दक्षिण आफ्रा, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे सहा संघ सहभागी झाले आहेत.

Comments are closed.