खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय! धोकादायक परिस्थितीमुळे भारत–दक्षिण आफ्रिका चौथा टी-20 सामन

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथी T20 रद्द : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना आज लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरत हा सामना अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे पाऊस किंवा वादळ नसतानाही सामना रद्द व्हावा, ही बाब सगळ्यांनाच चकित करणारी ठरली.

भारत–दक्षिण आफ्रिका चौथा टी-20 सामना अखेर रद्द

लखनऊमध्ये संध्याकाळपासूनच मैदानात धुक्याची चादर होती. याच कारणामुळे नियोजित वेळेत टॉस होऊ शकला नाही. सुरुवातीला पंचांनी सायंकाळी 6:50 वाजता मैदानाची पाहणी केली. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा न झाल्याने टॉस पुढे ढकलण्यात आला. धुक्याची तीव्रता कायम राहिल्याने पंचांनी 7:30 वाजता पुन्हा निरीक्षण केले. या वेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी पंच चर्चा करताना दिसले. मात्र दृश्यता अत्यंत कमी असल्याने खेळ सुरू करणे धोकादायक ठरू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला. यानंतर रात्री 8 वाजता पुन्हा एकदा मैदानाची पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण धुक्यात कोणतीही लक्षणीय सुधारणा न झाल्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा कठोर निर्णय पंच आणि सामना अधिकाऱ्यांना घ्यावा लागला.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय!

खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता टॉसही होऊ शकला नाही. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहते आणि टीव्हीसमोर बसलेले लाखो क्रिकेटप्रेमी निराश झाले. मालिकेच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. मात्र खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सामना रद्द करणे अपरिहार्य ठरले. आता मालिकेतील पुढील आणि शेवटच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुखापतीमुळे शुभमन गिल संघाबाहेर

सामना रद्द झाला असला तरी, सामन्यापूर्वीच मोठी बातमी आली होती. स्टार फलंदाज शुभमन गिल संघाबाहेर गेला. वृत्तानुसार, सामन्याच्या आदल्या दिवशी सराव सत्रादरम्यान चेंडू लागल्याने गिलच्या पायाला दुखापत झाली. तो वेळेत दुखापतीतून बरा होऊ शकला नाही, त्यामुळे त्याला सामन्यासाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. गिलची मालिका खराब राहिली आहे, त्याने तीन सामन्यांमध्ये फक्त 32 धावा केल्या आहेत. गिलच्या अनुपस्थितीमुळे संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित आहे.

हे ही वाचा –

Shubman Gill News : मैदानावर धुकं, टॉसला विलंब… त्यात सामन्यापूर्वी ट्विस्ट! उपकर्णधार शुभमन गिल अचानक मालिकेतून बाहेर, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.