दक्षिण आफ्रिकेचाच चढला पारा! मुथुसामीचे शतक आणि यानसनच्या झंझावातामुळे दिवसावर आफ्रिकेचे वर्चस्व

बरसापारा स्टेडियममध्ये रविवारी जगज्जेत्या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा पारा चढला. 6 बाद 246 वरून सर्वबाद 489 धावांपर्यंत आपल्या धावांचा गाडा हाकत पाहुण्यांनी हिंदुस्थानी खेळपट्टय़ांवर एक वेगळीच पटकथा लिहायला घेतल्याचे दिसून आले. दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी दबावाखाली फलंदाजी करत हिंदुस्थानी गोलंदाजांनाच दडपणाखाली आणले आणि एका संस्मरणीय कसोटी मालिकेच्या दिशेने पावले टाकल्याचे संकेत दिले.

इतकी मोठी धावसंख्या केल्यानंतर हिंदुस्थानी खेळपट्टीवर संघ हरत नसतो. हा इतिहास आहे. हिंदुस्थानची फलंदाजी हा इतिहास बदलते की दक्षिण आफ्रिकेला इतिहास घडवायला हातभार लावते ते उद्या दिसेलच. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हिंदुस्थानी सलामीवीर यशस्वी जैसवाल (7) आणि राहुल (2) खेळपट्टीवर थांबले होते. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर हिंदुस्थानी संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी उद्या आधी 290 धावांचा टप्पा गाठावाच लागेल. बाकी सर्वकाही नंतर.

आजचा दिवस सेनुरन मुथुसामी आणि माकाx यानसनचा होता. मुथुसामीचे पहिलेवहिले शतक आणि यानसनचा 93 धावांचा झंझावात पाहून सारेच अवाप् झाले. जवळपास तीन सत्रे हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी इंचइंच लढा दिला, मात्र पाटा खेळपट्टीवर त्यांना फारशी करामत दाखवता आली नाही. पण मुथुसामीने कायल वेरेन आणि यान्सनबरोबर केलेल्या भागीने आजच्या खेळाचा सारा नूरच पालटवला.

माकाxचे षटकार वाहन निघाले

मुथुसामीसह प्रारंभी संयमाने खेळल्यानंतर यानसनच्या फलंदाजीने अवकाशयानासारखे उत्तुंग फटके मारले. तो असा सुस्साट निघाला की, त्याने कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजाला टी-20 क्रिकेट खेळत असल्याचा फिल दिला. 7 गगनचुंबी षटकार खेचत त्याने संघाला 400 हून 500 च्या दिशेने रॉकेटच्याच वेगाने नेले. मुथुसामीपाठोपाठ तोसुद्धा आपले पदार्पणीय शतक ठोकणार असे वाटत होते, पण त्याचे शतक 7 धावांनी हुकले. 7 षटकार आणि 6 चौकारांच्या या खेळीचे शतक जरी हुकले असले तरी तो आपल्या संघाला उम्मीद से दुगना अशा लक्ष्यापर्यंत पोहचवण्यात यशस्वी ठरला.

गमावणे मुश्कील आहेत…?

पहिल्या डावात 489 इतक्या मोठय़ा धावा करून हिंदुस्थानमध्ये कसोटी हरलेला संघ अद्याप नाही. ही सांख्यिकी माहिती दक्षिण आफ्रिकेला आत्मविश्वास देणारीच ठरणार आहे आणि तितकेच हिंदुस्थानी संघाच्या मनोधैर्याचे खच्चीकरणही करणारी आहे. आफ्रिकन संघ हिंदुस्थानी भूमीवर एकदाही कसोटी मालिका जिंकलेला नाही. गेल्या वर्षी न्यूझीलंडही याच अवस्थेत होता आणि त्यांनी हाच इतिहास रचला होता. आता दक्षिण आफ्रिकाही त्या क्षणापासून फार दूर दिसत नाहीय. पण आताचे कसोटी क्रिकेट क्षणाक्षणाला नाटय़मय वळण घेते, हे विसरून चालणार नाही. कधी कोणता संघ स्पीडब्रेकर अडथळय़ाने पराभवाच्या दरीत उडेल हे सांगता येत नाही. गेल्या आठवडय़ात कोलकात्यात तेच घडले होते आणि शनिवारी पर्थवरही ऑस्ट्रेलियाने असा अनर्थ घडवला होता. कसोटी अजून संपलेली नाहीत. बरसापारात पुढील दोन दिवस हिंदुस्थानी फलंदाजांचा पारा चढला तर इतिहासाचा पाराही बदलू शकतो. हिंदुस्थानकडून घरच्या खेळपट्टीवर जोरदार प्रत्युत्तराची अपेक्षा आहे. फक्त अपेक्षाभंग करू नये.

मुथुसामीचा पराक्रम

आठवी कसोटी खेळणाऱ्या मुथुसामीने आज वेगळय़ाच फलंदाजीची झलक दाखवली. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांविरुद्ध भक्कम प्रंटफूट संरक्षण आणि फिरकीपटूंविरुद्ध बॅकफूटवरून मोकळे शॉट्स यांचा देखणा नजराणा त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळाला. 48 धावांवर असताना जाडेजाच्या चेंडूवर त्याला पायचीत देण्यात आले. मात्र डीआरएसने त्याची सुटका केली आणि त्यानंतर त्याने कसलीही घाई न करता शतकी टप्पा गाठला. अडीचशेच्या आत आफ्रिकन फलंदाजी संपली होती. त्यांच्यासाठी 300 धावाही खूप वाटत होत्या. पण मुथुसामीने कायल वेरेनसह  88 धावांची भन्नाट भागी रचली. या भागीने आफ्रिकेला असे स्फुरण दिले की, पुढची दोन सत्रेही त्यांनी खेळून काढली. सॉरी हिंदुस्थानी गोलंदाजीला त्यांनी आपल्या फलंदाजीवर नाचवले.

हिंदुस्थानच्या रणनीतीला धक्का

विकेट मिळत नसल्याने हिंदुस्थानी कर्णधार ऋषभ पंतला क्षेत्ररचना पसरवावी लागली. त्याचा फायदा घेत दक्षिण आफ्रिकेने एकेरी धावा काढत संघाचा धावफलक कोणताही धोका न घेता हलता ठेवला. जाडेजाने अखेर वेरेनला बाद करून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले, पण त्यानंतर आक्रमणाचा वेग अधिकच वाढला. मुथुसामी आणि यानसनने हिंदुस्थानी गोलंदाजांची अक्षरशः परीक्षाच घेतली. ही जोडी पह्डण्यासाठी हिंदुस्थानने साम-दाम-दंड-भेद सर्वकाही डावपेच आखले, पण ते सारे फेल गेले.

Comments are closed.