क्रिकेटनामा – मुथुसामीला मानाचा मुजरा!
>>संजय कऱ्हाडे
आसामी संस्कृतीचं द्योतक आहे अतिशय आकर्षक बिहू नृत्य. अत्यंत लयबद्ध आणि मोहक! गुवाहाटीच्या खेळपट्टीवर दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकन संघाने याच बिहुचा रमणीय प्रत्यय आपल्याला दिला. या मनोरम नृत्याचा नायक होता शतकवीर मुथुसामी. त्याने आपलं पहिलं कसोटी शतक साकारलं ते दहा चौकार अन् दोन षटकारांनी. त्याने दाखवलेला संयम, निग्रह काwतुकास्पद होता. आफ्रिकन संघ सुरक्षित परिस्थितीत पोहचेपर्यंत त्याने स्वतःची आणि त्याच्या बॅटची मान झुकवून फलंदाजी केली. मुथुसामी, तुला मानाचा मुजरा! स्टेडियममध्ये हजर असलेल्या साधारण वीस हजार क्रिकेटप्रेमींनी मुथुसामीला उभं राहून दिलेल्या मानवंदनेलाही माझा कुर्निसात. कोंबडय़ांची झुंज पाहणाऱ्या अन् क्रिकेटचा किंवा कुठलाही इतर खेळ पाहणाऱ्या जनतेमध्ये फरक असणं अत्यावश्यक आहे!
लक्षवेधक बिहूला अधिक रंगतदार बनवलं कप्तान बव्हुमा, मार्व्रम, रिकलटन, स्टब्स आणि वेरायनसारख्या समर्पित फलंदाजांनी.
यान्सनने मात्र आफ्रिकन झुलू नृत्याचं दमदार प्रदर्शन केलं. त्याने चार वेळा बॅट बदलत सहा चौकार अन् तब्बल सात षटकारांनी आदळआपट केली आणि 91 चेंडूंत धुवाधार 93 धावा फटकावल्या!
दक्षिण आफ्रिका सर्वबाद 489. थोडक्यात, दीडशे षटकं खेळून त्यांनी हा सामना हिंदुस्थानी संघापासून तेवढेच मैल दूर नेऊन ठेवलाय!
माझ्या मते आपण या सामन्यात अंमळ जास्तच मागे पडलोय. संघाच्या नावावर फक्त 9 धावा आहेत. कसोटी सामन्यात उरलेल्या 480 धावांचा पाठलाग करून बाकीच्या तीन दिवसांत सामना जिंकण्यासाठी असामान्य अशा कर्तृत्ववान फलंदाजांची आवश्यकता असते. एवढय़ा धावा हाता-पायात दोन मणाचं असह्य वजन निर्माण करू शकतात. त्याशिवाय गंभीर व्यवस्थापनाच्या अनाकलनीय काढा-बदला-फेका वृत्तीने तयार झालेली साशंकता दडपणात भरच घालतेय. अशा वातावरणाची मानगूट पकडून धुडकावणारे फलंदाज आज आपल्याकडे आहेत का? यशस्वी, राहुल, साई, जुरेल, पंत, जडेजा, नितीश आणि सुंदर सरासरी साडेचार-पाच धावांच्या गतीने तिसऱ्या दिवशीच्या खेळपट्टीवर आगेकूच करू शकतील का हा प्रश्न आहे. मुळात, 480 धावांपर्यंत मजल मारताना आपली किती अन् कशी दमछाक होईल हेसुद्धा पाहण्यासारखंच असेल. त्याचप्रमाणे ज्या गोलंदाजांनी पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघाला धावांचा डोंगर उभारू दिला, तेच गोलंदाज तिसऱ्या डावात त्यांना किती लवकर बाद करू शकतील अशीही एक शंका आहेच! बुमरा, सिराज, जडेजाने दोन-दोन आणि कुलदीपने चार बळी घेतले खरे, पण त्यांनी आफ्रिकेला गुंडाळालं असं म्हणता येणार नाही. खेळपट्टीची आतापर्यंतची तब्येत लक्षात घेतली तर ती यापुढे फारशी करामत दाखवेल असं वाटत नाही. अन् चौथ्या डावात आपल्याला फलंदाजी करायची आहे हो!
नकारात्मक सूर लावणारा नाऱ्या मी नाही. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणून मायेपोटी मनात येणाऱ्या शंका व्यक्त करतोय इतकंच! इथून सामना जिंकला तर त्याला चमत्कारच म्हणावं लागेल. अन् त्यापेक्षा कुठलाही दुसरा निर्णय लागला तर तो साजरा करण्यासाठी आफ्रिकन संस्कृतीत इतर अनेक नृत्य प्रकार असतीलच!
Comments are closed.