IND W vs SA W Final – पावसामुळे अंतिम सामना रद्द झाल्यास वर्ल्डकप कोण उंचावणार? जाणून घ्या नियम…

आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना यजमान हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर हा सामना सुरू होईल. दोन्ही संघ पहिल्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असतानाच क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवणारी बातमी आहे. 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम लढतीवर पावसाचे सावट आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाला तर विश्वचषक कोण उंचावणार? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा धुव्वा उडवत पहिल्यांदा फायनल गाठली, तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये हिंदुस्थानने 7 वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तिसऱ्यांदा फायनल गाठली. 2 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगणार असून यावर पावसाचे सावट आहे. AccuWeather च्या अंदाजानुसार, पावसाची शक्यता 63 टक्के असून सायंकाळच्या सुमारास जोरदार हवेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पहिला पर्याय –

आयसीसीच्या नियमानुसार 2 नोव्हेंबर रोजी किमान 20-20 षटकांचाही खेळ शक्य झाला नाही तर हा सामना 3 नोव्हेंबर या रिझर्व्ह डेच्या दिवशी खेळवला जाईल.

दुसरा पर्याय –

3 नोव्हेंबर रोजीही पावसाची शक्यता 55 टक्के असून त्या दिवशीही किमान 20-20 षटकांचा खेळ झाला नाही तर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेला संयुक्त विजेते घोषित केले जाईल. 2002 मध्येही आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफीवेळीही हिंदुस्थान आणि श्रीलंकेला संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आले होते.

Comments are closed.