Asia Cup 2025: टीम इंडियासमोर युएईचा धुव्वा उडाला, भारताची विजयी सलामी

टी20 आशिया कप 2025 मध्ये भारताने वादळी सुरुवात केली आहे. बुधवारी भारताने यूएईविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. भारताला फक्त 58 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 4.3 षटकात पूर्ण केले. भारताने 93 चेंडू शिल्लक असताना विजयाचा झेंडा फडकवला. अभिषेक शर्माने 16 चेंडूत 30 धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. शुभमन गिलने 9 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या. ज्यात त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद 7 धावा केल्या.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि युएईला जोरदार धक्का दिला. भारताने युएईला 13.1 षटकात फक्त 57 धावांवर बाद केले. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही युएईची सर्वात कमी धावसंख्या आहे. फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे यांनी कहर केला. कुलदीपने 2.1 षटकात 7 धावा देत चार विकेट्स घेतल्या. शिवमने 2 षटकांत 4 धावा देऊन तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या यूएई संघाने एकही बळी न गमावता 26 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कहर केला. यूएईने फक्त 31 धावांत 10 बळी गमावले. यूएईकडून अलिशान शराफू (22) यांनी सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार मोहम्मद वसीमने 19 धावा केल्या. यष्टीरक्षक राहुल चोप्रा (3) आणि हर्षित कौशिक (2) यांच्यासह यूएईचे आठ खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. कुलदीपने नवव्या षटकात तीन बळी घेतले, ज्यामुळे यूएईचे कंबरडे मोडले. भारत आशिया कपचा गतविजेता आहे. आशिया कपच्या इतिहासात भारताने सर्वाधिक आठ विजेतेपदे जिंकली आहेत.

Comments are closed.